ग. स. सोसायटीतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा
उपनिबंधकांनी उठविली स्थगितीजळगाव : जिल्हा सहकारी नोकरांची पतसंस्था लि. अर्थात ग. स. सोसायटीमधील नोकरभरती प्रक्रिया पूर्ववत झाली आहे. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी स्थगिती दिल्यानंतर या भरती प्रक्रियेविषयी माहिती मागविण्यात आली होती. ग. स. सोसायटीने सादर केलेल्या माहितीच्या पडताळणीअंती प्रक्रियेत कुठलाही गोंधळ नसल्याचे स्पष्ट झाल्याने उपनिबंधकांनी स्थगिती उठविली आहे.या भरती प्रक्रियेसंदर्भात मुक्ताईनगरचेआमदार चंद्रकांत पाटील यांनी नोकरभरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत, नामांकित एजन्सीमार्फत भरती न होता प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने राबविली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच भरती करताना सेवानिवृत्त सभासद व सध्या कार्यरत सभासदांच्या संख्येत तफावत असल्याने ही भरती रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांना आवश्यक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार या नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती.नोकरभरती संशयास्पद : खडसेग. स. सोसायटीत होत असलेली नोकरभरती संशयास्पद आहे. या भरतीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. सोसायटीचे ३ सदस्य आर. पी. पाटील, नितीन भोंबे व एन. आर. पाटील हे या नोकरभरती विरोधात सहकार कोर्टात जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला. जळगावातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते. ही भरती प्रक्रिया शासनाने नेमून दिलेल्या एजन्सीच्या माध्यमातून घेतली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.