logo

जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली दोन लाखांची लाच; उपशिक्षक व विद्यापीठ सिनेट सदस्य अटकेत

जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी न्यू सिटी हायस्कूल, देवपूर (धुळे) येथील उपशिक्षक तसेच विद्यापीठ सिनेट सदस्य नितीन लीलाधर ठाकूर (वय ४६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिनांक १८ रोजी दुपारी सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे धुळे शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार व त्याच्या बहिणीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सन २०२२ मध्ये धुळे येथील अनुसूचित जाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने जात प्रमाणपत्र हवे असल्यास न्यू सिटी हायस्कूल देवपूर येथील उपशिक्षक नितीन ठाकूर यांची भेट घेण्याचा सल्ला दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानुसार तक्रारदाराने ठाकूर यांची भेट घेतली असता, समितीतील अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे दिल्याशिवाय जात वैधतेचे काम होणार नाही, असे सांगत दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचून ठाकूर याला रंगेहात अटक केली.

या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेनंतर जिल्हा न्यायालयाने आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल व त्यांच्या पथकाने केली.

23
917 views