दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी १८ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षकासह खाजगी सहाय्यक अटक
जळगाव प्रतिनिधी |दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या वडिलांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईतून सुटका करून देण्यासाठी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी १० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह त्याच्या खाजगी सहाय्यकास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये दुय्यम निरीक्षक विजय भास्कर पाटील आणि भास्कर रमेश चंदनकर (पंटर) यांचा समावेश आहे. रावेर तालुक्यातील खानापूर येथील तक्रारदाराच्या वडिलांविरुद्ध कारवाई न करण्यासाठी १२ हजार रुपये तसेच तक्रारदाराचा दारू विक्रीचा व्यवसाय पुढेही सुरू ठेवण्यासाठी मागील १२ महिन्यांचे प्रत्येकी दीड हजार रुपये प्रमाणे एकूण १८ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.याप्रकरणी तक्रारदाराने दिनांक १७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी तक्रारीची स्वतः खातरजमा केल्यानंतर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, भूषण पाटील यांच्या पथकाने साध्या वेशात सापळा रचला.ठरल्याप्रमाणे लाचेचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताच पथकाने झडप घालून दुय्यम निरीक्षक विजय पाटील आणि त्याचा खाजगी सहाय्यक भास्कर चंदनकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर पुढील तपास करीत आहेत.