logo

लाच घेताना उत्पादन शुल्क अधिकाऱ्यासह दोन अटकेत



रावेर : अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुय्यम निरीक्षक व त्याचा खासगी वाहनचालक अशा दोघांना पकडण्यात आले. बुधवार दि. १७ रोजी खानापूर टोलनाक्याजवळ रात्री दहा वाजता ही कारवाई करण्यात आली.-

दुय्यम निरीक्षक विजय भास्कर पाटील (५१) व चालक भास्कर रमेश चंदनकर (४३, दोन्ही रा. खानापूर ता. रावेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या वडिलांवर यापूर्वी दाखल असलेल्या दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात आणि अवैध दारू विक्रीचा व्यवसाय पुढे अव्याहत सुरू ठेवण्यासाठी १५०० रुपये प्रतिमाहप्रमाणे एक वर्षाच्या १८ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार रुपये रकमेची लाच चंदनकर याला देताना ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.कॉ. भूषण पाटील व पो.ना. बाळू मराठे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. याप्रकरणी नागरे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत.

6
566 views