
पित्याच्या स्मृतिप्रित्यर्थ गावात उभारली आदर्श प्रतिमा
डोलदा येथील आदिवासी भगिनींचा समाजासमोर प्रेरणादायी आदर्श
पित्याच्या स्मृतिप्रित्यर्थ गावात उभारली आदर्श प्रतिमा
डोलदा येथील आदिवासी भगिनींचा समाजासमोर प्रेरणादायी आदर्श
ऑल इंडिया | प्रतिनिधी (शत्रू आतला )
आई-वडिलांच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद, कुटुंबातील फूट आणि न्यायालयीन संघर्ष आज समाजात वाढताना दिसत असताना, एटापल्ली तालुक्यातील डोलदा गावातील एका आदिवासी कुटुंबातील पाच बहिणींनी समाजासमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
डोलदा गावाचे माजी पुजारी (भुमिया) स्व. चमरू तुलाराम कोरचा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कन्यांनी गावाच्या सीमेवर त्यांच्या पित्याची प्रतिमा उभारली. या माध्यमातून त्यांनी समाजाला एकात्मता, संस्कार आणि स्मृती जपण्याचा संदेश दिला.
स्व. चमरू कोरचा हे आदिवासी समाजातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सुमारे २१ गावांमध्ये पुजारी म्हणून सेवा दिली. आदिवासी रीतिरिवाजांचे जतन, सामाजिक सलोखा राखणे आणि मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे हे त्यांचे जीवनकार्य होते.
१४ डिसेंबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कार्याची आठवण जिवंत ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत या उद्देशाने पाचही बहिणींनी एकमताने प्रतिमा उभारण्याचा निर्णय घेतला.
१४ डिसेंबर २०२५ रोजी डोलदा गावात भावनिक वातावरणात प्रतिमेचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ही प्रतिमा केवळ स्मृतीचिन्ह नसून समाजासाठी एक जिवंत संदेश आहे. गावाच्या सौंदर्यीकरणासोबतच येथे येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
डोलदा गावातील या आदिवासी भगिनींच्या एकतेने, संस्कारांनी आणि कृतज्ञतेने समाजाला भावूक केले असून, आजच्या बदलत्या सामाजिक वातावरणात हा उपक्रम एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.