logo

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू; 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकल ; महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू

महाराष्ट्र राज्यातील शहरी राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या २९ महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केला असून, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. या घोषणेसोबतच आजपासून सर्व महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शासनाकडून कोणत्याही नवीन योजना, निधी वाटप किंवा जाहिरातींवर निर्बंध आले आहेत.

या निवडणुकांमध्ये राज्यभरातील 2879 नगरसेवकांची निवड होणार असून, 3 कोटी 48 लाखांहून अधिक मतदार आपला कौल देणार आहेत. मुंबई, नवीमुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, अकोला यांसारख्या प्रमुख महानगरपालिकांचा यामध्ये समावेश आहे. अनेक महापालिकांमध्ये मागील काही वर्षांपासून प्रशासक राजवट असल्याने, या निवडणुकांकडे जनतेचे विशेष लक्ष लागले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. आयोगाने यंदा पारदर्शकतेवर भर देत नामनिर्देशन अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा कायम ठेवली आहे. निवडणूक चिन्हांचे वाटप अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर केले जाणार आहे.

महत्त्वाचा नियम म्हणून, निवडून येणाऱ्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात निवडणूक निकालांवर निर्माण होणारे कायदेशीर वाद टाळण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. यापूर्वी अनेक महानगरपालिकांमध्ये जात वैधतेअभावी नगरसेवक अपात्र ठरल्याच्या घटना घडल्या होत्या.

मतदार यादीच्या संदर्भात आयोगाने 1 जुलै 2025 रोजीची अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली आहे. दुबार नोंद असलेल्या मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह देण्यात आले असून, अशा मतदारांची मतदान केंद्रावर विशेष तपासणी केली जाणार आहे. यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचा दावा आयोगाने केला आहे.

मुंबई महानगरपालिकेत निवडणूक व्यवस्थापनासाठी मोठी यंत्रणा उभारण्यात आली असून, 10 हजार 111 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही मतदारसंख्या लक्षात घेऊन अतिरिक्त मतदान केंद्रे, ईव्हीएम आणि मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येत आहे.

महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आयोगाने यंदाही ‘गुलाबी मतदान केंद्र’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांवर सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असतील, तसेच महिला मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे शहरी भागात महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.

या निवडणुकांकडे राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले असून, अनेक पक्षांनी उमेदवार निवड, आघाडी-बिघाडी आणि प्रचार यांची तयारी सुरू केली आहे. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे येत्या काळातील राज्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरणार असल्याने, 15 जानेवारीचा मतदान दिवस आणि 16 जानेवारीचा निकाल दिवस राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

2
84 views