logo

झरी तालुक्यातील पिंप्रड येडशी दरम्यान पैनगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत

झरी तालुक्यातील पिंप्रड आणि येडशी गावांदरम्यान पैनगंगा नदीच्या काठावरील शेत शिवारात गेल्या काही दिवसांपासून वाघाची दहशत पसरली आहे. यामुळे या भागातील शेतकरी आणि शेतमजूर धास्तावले असून त्यांनी शेतात कामासाठी जाणे थांबवले आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंबर रोजी सकाळी एका शेतकऱ्याला आपल्या शेतात काम करत असताना वाघ प्रत्यक्ष नजरेस पडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वाघाच्या दर्शनाची ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने नदीकाठावरील शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांनी शेतात जाणे पूर्णपणे टाळले आहे. वाघाच्या हल्ल्याची भीती असल्यामुळे शेतीचे काम खोळंबले आहे.
पिंप्रड आणि येडशी भागातील शेतकरी प्रामुख्याने रब्बी पिकांची कामे करत आहेत. मात्र, वाघाच्या या वाढत्या संचारामुळे शेतात जाणे धोक्याचे झाले आहे. शेतमजूर काम करण्यास तयार नसल्यामुळे शेतीत कपुस वेचणी, पिकांना पाणी देणे मशागत वगैरे किंवा इतर आवश्यक कामे खोळंबली आहेत.
या परिसरामध्ये वाघाचा मुक्त संचार असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाने लक्ष घालून या वाघाचा बंदोबस्त करावा किंवा त्याला सुरक्षित अधिवासात पाठवावे, अशी मागणी होत आहे. वनविभागाने गस्त वाढवून शेतकऱ्यांची भीती दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0
0 views