
बीड शहराची धोकादायक वस्तुस्थिती — अग्निशमन दलाकडे केवळ एकच बचाव गाडी!
बीड (महाराष्ट्र):
डिझेल ट्रक अपघाताच्या घटनेनंतर जखमींना ॲडमिशन व बचावासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र या वेळी एक अत्यंत गंभीर व धक्कादायक वास्तव समोर आले. संपूर्ण बीड शहरासाठी अग्निशमन दलाची फक्त एकच बचाव (फायर फायटर) गाडी उपलब्ध आहे.
घटनेच्या वेळी परिस्थिती गंभीर असल्याने त्या एकाच गाडीवर संपूर्ण बचावकार्य अवलंबून होते. अपघाताचा धोका लक्षात घेता तातडीने गेवराई तालुक्यातून अतिरिक्त अग्निशमन वाहन मागवावे लागले. बाहेरून वाहन येईपर्यंत बचावकार्यावर परिणाम झाला, हे वास्तव नाकारता येत नाही.
आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर मदत मिळणे अत्यावश्यक असते. मात्र बीडसारख्या जिल्हा मुख्यालयात अग्निशमन दलाकडे फक्त एकच बचाव गाडी असणे हे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांचा थेट सवाल आहे—
“बीड ला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला, मग जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक मूलभूत सुविधा कुठे आहेत?
दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो, तो निधी नेमका कुठे जातो?”
बीड ला जिल्हा म्हणून ओळख मिळून अनेक वर्षे झाली, तरीही आजही आपत्कालीन सेवांसाठी जिल्हा तालुक्यावर अवलंबून आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कोट्यवधींच्या निधीची आकडेवारी कागदावरच राहते की काय, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आग, अपघात किंवा स्फोटासारख्या घटनांमध्ये काही मिनिटांचा विलंबही जीवघेणा ठरू शकतो. अशा वेळी फक्त एकच बचाव गाडी असणे म्हणजे बीडकरांच्या जीवाशी उघडपणे खेळ असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
आता प्रश्न असा आहे की—
बीड ला जिल्ह्याचा दर्जा दिला गेला, मग सुविधा तालुक्याहून का मागवाव्या लागतात?
कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च होतो?
या गंभीर दुर्लक्षाला जबाबदार कोण?
बीड कर जनतेची स्पष्ट मागणी आहे की निधीच्या वापराचा जाहीर खुलासा करावा, तत्काळ नवीन अग्निशमन व बचाव गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
— जन-जन की आवाज
प्रतिनिधी : शेख गालिब