
जळगावला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी रिंग रोडचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे — खासदार स्मिताताई वाघ यांची पुढाकार
जळगावला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी रिंग रोडचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे — खासदार स्मिताताई वाघ यांची पुढाकार
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपघातांची भीती आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला आहे.
खासदार वाघ यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की— शहराच्या मुख्य मार्गांवर वाढत असलेला ट्रॅफिक, शहरात आत-बाहेर येणाऱ्या बाह्य वाहनांची वाढलेली संख्या, औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार आणि लॉजिस्टिक पार्कला मिळणारे आर्थिक महत्त्व या सगळ्यांचा विचार करता रिंग रोडची उभारणी अत्यावश्यक झाली आहे.
रिंग रोड झाल्यानंतर—
शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार,
बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहरात न शिरताही पर्यायी मार्ग उपलब्ध होणार,
औद्योगिक, कृषी व व्यावसायिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रस्तावासाठी तात्काळ डिपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) तयार करून हा प्रकल्प केंद्राच्या मुख्य पायाभूत सुविधा योजनांमध्ये समाविष्ट करण्याची विनंती खासदार वाघ यांनी केली आहे. तांत्रिक सर्वेक्षण व वाहतूक तज्ज्ञांच्या अहवालांच्या आधारे हा प्रकल्प तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
रिंग रोडसाठी सुचवलेले प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जोडमार्ग—
NH-53 (सूरत – नागपूर),
NH-753F (बूरहानपूर – औरंगाबाद),
NH-753J (जळगाव – चाळीसगाव),
तसेच महत्त्वाचे MDR आणि आंतर-जिल्हा मार्ग यांचा समावेश असणार आहे.
खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या—
“जळगावचा सर्वांगीण विकास हा माझा प्राधान्यक्रम आहे. रिंग रोड उभारला गेल्यास वाहतूक, उद्योग, सुरक्षा आणि आर्थिक प्रवाहामध्ये मोठे परिवर्तन घडेल. शहराला याचा दीर्घकालीन फायदा होणार आहे.”