logo

मल्टीस्टेट घोटाळ्याविरोधात ठेवीदारांचा प्रचंड संताप; जप्त मालमत्तेच्या लिलावाची तारीख जाहीर करा — बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणा

बीड, दि. 12 डिसेंबर (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेट संस्थांमध्ये अडकलेल्या हजारो ठेवीदारांना न्याय मिळावा, जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची तारीख जाहीर करावी तसेच वसूल रक्कम ठेवीदारांना परत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज ठेवीदार संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमान संघटना जिल्हाध्यक्ष तथा ठेवीदार संघर्ष कृती समितीचे मुख्य प्रवर्तक प्रा. सचिन किशोर उबाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनात मोठ्या संख्येने ठेवीदार, नागरिक उपस्थित होते.
समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, राजस्थानी पतसंस्था, माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, लक्ष्मीमाता अर्बन, मराठवाडा अर्बन (माजलगाव) या सर्व संशयास्पद मल्टीस्टेट संस्थांच्या जप्त मालमत्तेचा लिलाव दिनांक तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की—
गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदारांना एकही रुपया परत मिळालेला नाही. ज्ञानराधा मल्टीस्टेटची उर्वरित मालमत्ता जप्त करावी, तिसगाव डेअरी व फलटण डेअरी जप्त कराव्या, सर्व मल्टीस्टेट संस्थांचे फॉरेन्सिक ऑडिट तातडीने करण्यात यावे तसेच ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची तारीख जाहीर करावी, अशी ठाम मागणी समितीने केली आहे.
ठेवीदारांनी केलेल्या असंख्य निवेदनांनंतरही व मंत्रालयीन बैठकीनंतरही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप समितीने केला. “ठेवीदारांचा पैसा कुठे गेला? कोण जबाबदार?” याचा छडा लावून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, मत्स्य व बंदरे मंत्री, तसेच बीड, माजलगाव व गेवराईचे आमदार यांना देण्यात आली आहे.
आंदोलनाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वातावरण शांत असले तरी ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण जाणवत होते.
बीड | प्रतिनिधी – जन-जन की आवाज Shaikh Galib (AIMA Media)

28
3737 views