logo

शालार्थ आयडी आर्थिक फसवणुकीत तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण निलंबित

जळगाव प्रतिनिधी – शासनाच्या शालार्थ आयडी आर्थिक फसवणूक प्रकरणातील फिर्यादी असलेले तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांचाही सहभाग तपासात निष्पन्न झाल्याने शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. चव्हाण सध्या अमरावती येथे विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव म्हणून कार्यरत होते. दरम्यान, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

विशेष म्हणजे, या घोटाळ्याप्रकरणी मार्च महिन्यात चव्हाण यांच्या फिर्यादीवरूनच फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासात तेच मुख्य संशयित असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाने काही शिक्षण संस्थाचालकांना अटक केल्यानंतर या प्रकरणाने मोठे वळण घेतले असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अर्थातच, नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल शालार्थ घोटाळा प्रकरणाच्या तपासात पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अंमळनेर येथून मनोज रामचंद्र पाटील (नवलनगर, धुळे), निलेश निंबा पाटील (चिंचोली, चोपडा), अविनाश पाटील आणि दत्तात्रय पाटील यांना अटक केली आहे. मनोज आणि दत्तात्रय हे शिक्षण संस्थाचालक आहेत, तर निलेश हा जिल्हा परिषद कर्मचारी आहे.

याच गुन्ह्यात नाशिक रोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनाही आरोपी करण्यात आले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. गेल्या आठवड्यात माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

1
224 views