9 छत्तीसगडी माओवाद्यांसह एकूण 11 जणांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण
सर्वांवर मिळून 82 लाखांचे बक्षीस
9 छत्तीसगडी माओवाद्यांसह एकूण 11 जणांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण
सर्वांवर मिळून 82 लाखांचे बक्षीस
गडचिरोली : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे 4 महिला आणि 7 पुरूष माओवाद्यांसह एकूण 11 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. त्यातील दोघे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व एटापल्ली तालुक्याचे रहिवासी, तर 9 जण छत्तीसगडचे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे एकूण 82 लाख रुपयांचे बक्षीस होते.
4 बंदुका सोपवत त्यांनी नक्षल चळवळीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यात 2 डिव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह 3 पीपीसीएम, 2 एसीएम आणि 4 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नातून सन 2025 मध्ये आतापर्यंत आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांची संख्या 112 झाली आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे यांचा हे दि.9 आणि 10 डिसेंबर रोजी गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. दि.9 ला अतिसंवेदनशिल क्षेत्रात नव्याने उभारलेल्या पोलीस मदत केंद्राला भेट दिल्यानंतर आज या अधिकाऱ्यांपुढे 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. राज्य शासनाच्या आत्मसमर्पण धोरणाला प्रतिसाद देत आतापर्यंत 783 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
बुधवारी आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये रमेश ऊर्फ भीमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी (डिव्हीसीएम- भामरागड दलम) रा.एडसगोंदी, ता.एटापल्ली, 2) भीमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी (डिव्हीसीएम/ पश्चिम बस्तर डिव्हीजन कमिटी सदस्य), रा.चिंतागुफा, जि.सुकमा (छ.ग.), 3) पोरीये ऊर्फ लक्की अडमा गोटा (पीपीसीएम / सेक्शन कमांडर, पीएलजीए बटालीयन क्र.1, रा.चेरपल्ली, जि.बिजापूर (छ.ग.), 4) रतन ऊर्फ सन्ना मासु ओयाम (पीपीसीएम कंपनी क्र.7), रा.टेकलगुडा, जि.बिजापूर (छ.ग.), 5) कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी (पीपीसीएम कंपनी क्र.7), रा.एडापल्ली, जि.बिजापूर (छ.ग.) 6) पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी (एसीएम– कान्हा भोरमदेव दलम, एमएमसी झोन), रा.चेरपल्ली, जि. बिजापूर (छ.ग.), 7) रामजी ऊर्फ मुरा लच्छु पुंगाटी (एसीएम, कुतूल एरीया कमिटी), रा.कुमनार, ता.भामरागड, 8) सोनु पोडीयाम ऊर्फ अजय सानू कातो (सदस्य, कंपनी क्र. 1 मधील प्लाटुन क्र.2, रा.बेतेबेडा, जि.कांकेर (छ.ग.), 9) प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी (सदस्य, प्लाटून क्र.32, रा.गट्टेकाल, जि.नारायणपूर (छ.ग.), 10) सीता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो (सदस्य, प्लाटून क्र.32, रा.पदगुंडा, जि.नारायणपूर (छ.ग.) आणि 11) साईनाथ शंकर मडे, (सदस्य, एओबी (आंध्रा-ओरीसा बॉर्डर) सीसीसीएम उदय याचा गार्ड), रा.सँड्रा, जि.बिजापूर (छ.ग.) यांचा समावेश आहे. यावेळी 4 माओवाद्यांनी त्यांच्या गणवेशात आपल्या शस्त्रांसह आत्मसर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून जिल्ह्यातून ही चळवळ हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
सी-60 पथकातील अधिकारी-जवानांचा सत्कार
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या भेटीदरम्यान पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला. आपल्या जीवाची पर्वा न करता अतिदुर्गम लाहेरीच्या जंगल परिसरात जाऊन माओवाद्यांच्या केंद्रिय समिती व पोलीत ब्युरोचा सदस्य तसेच केंद्रीय रिजनल ब्युरोचा सचिव मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण 61 माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची कामगिरी करणाऱ्या विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा यावेळी पोलीस महासंचालकांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस महासंचालकांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सी-60 चे अधिकारी व जवान यांच्या कामगिरीचे कौतुक केले. उर्वरीत माओवाद्यांनी हिंसेचा त्याग करुन सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येऊन शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच सदर कार्यक्रमप्रसंगी नागरी कृती उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी व अंमलदार यांना सुलभता व्हावी व दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने संकलित करण्यात आलेले ‘प्रोजेक्ट उडान-वेध विकासाचा शासकीय योजना मार्गदर्शिका’ या पुस्तिकेचे अनावरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांसाठी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधिरा, सहाय्यक पोलीस अधीक्षक (धानोरा) अनिकेत हिरडे तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक, पोलीस मुख्यालय तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले.