
काटोल तालुक्यातील राजीव गांधी निवासी अंध विद्यालय, काटोल येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप....!
काटोल (जि. नागपूर), 7 डिसेंबर 2025 :
राजीव गांधी निवासी अंध विद्यालय, काटोल येथे रयत क्रांती संघटना नागपूर जिल्ह्याच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत क्रांती संघटना नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाशजी नोरोलिया, सौ. ज्ञानेश्वरी नोरोलिया, अशोक महाजन, अश्विन नोरोलिया, अनुवस सावरकर, तसेच अमरावती जिल्ह्याचे सरचिटणीस व उपजिल्हाप्रमुख श्री. दिलीपराव खेरडे , गौरव खेरडे आणि सुरेशभाऊ गोहाड उपस्थित होते.
माननीय सदाभाऊ खोत कार्यक्रमास उपस्थित नसून, त्यांच्या वतीने त्यांचे PA आतिशभाऊ जायबाये कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर श्री. प्रकाशजी नोरोलिया यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पुढे आतिशभाऊ जायबाये यांनी विद्यार्थ्यांपैकी दुसरीचा विद्यार्थी शोयम गुजर याला ब्रेल लिपी वाचन करण्यास सांगितले. शोयमने ब्रेल लिपीचे अतिशय अचूक, स्वच्छ आणि आत्मविश्वासपूर्ण वाचन केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आतिशभाऊ जायबाये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “चौथीतील सामान्य विद्यार्थी देखील अनेकदा नीट वाचू शकत नाहीत; पण येथे अंध विद्यार्थी अत्यंत शुद्ध आणि सुंदररीत्या ब्रेल लिपीचे वाचन करतात, ही शाळेची व शिक्षकांची मोठी कामगिरी आहे.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री. नेहारे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विजय नारनवरे (चलन अवयव निर्देशक) यांनी केले. कार्यक्रमास बोरकुटे मॅडम, गजबे सर, वैशाली नेहारे, काळजीवाहक अधीक्षक त्र्यंबक बकाल, कनिष्ठ लिपिक प्रशांत पूनसे उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आणि ‘वंदे मातरम्’ या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.