
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशनासाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला.....
📍 नागपूर
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशनासाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक विभागप्रमुखाने तत्पर राहून सर्वत्र सुव्यवस्था राखण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
आढावा बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे (सचिव 1), मेघना तळेकर (सचिव-2), डॉ. विलास आठवले (सचिव-3) आणि शिवदर्शन साठ्ये (सचिव-4), विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.
अधिवेशन काळात मंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य व अन्य मान्यवरांसाठीची निवास व्यवस्था, इंटरनेट-वायफाय सुविधा, सुरक्षा, आरोग्य आदी सुविधांबाबतची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली. विधानभवन, रविभवन, नागभवन, हैद्राबाद हाऊस, आमदार निवास, सुयोग पत्रकार निवास येथे उभारलेले वैद्यकीय कक्ष आणि विधानभवनातील हिरकणी कक्ष व अन्न परीक्षकांची माहितीही संबंधित यंत्रणांनी दिली.
अधिवेशन संस्थगित झाल्यावर अधिकाऱ्यांना आपल्या गंतव्यस्थळी जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वे गाडी सोडण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या व ही मागणी रेल्वे विभागाकडून मान्यही करण्यात आली. बैठकीनंतर सभापती व उपसभापती यांनी विधिमंडळाची दोन्ही सभागृहे व परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.
#हिवाळीअधिवेशन२०२५
#WinterSession2025