
अयोध्येहून परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात : पिंप्राळा, जळगाव येथील महिलेचा मृत्यू, १५ जण जखमी
जळगाव प्रतिनिधी – अयोध्येहून परत येत असताना जळगाव जिल्ह्यातील भाविकांची बस उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे शनिवारी सकाळी भीषण अपघाताला सामोरी गेली. कुरेभार चौकात मागून आलेल्या भरधाव ट्रेलरने बसला जोरदार धडक दिल्याने बस रस्त्यावर उलटली. या दुर्घटनेत वर्षा किरण पाटील (रहिवासी पिंप्राळा, जळगाव – सध्या पुण्यात वास्तव्यास) या महिलेचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी भाविकांची नावे पुढीलप्रमाणे –
संजय प्रताप पाटील, भारत दगडू पाटील, साहेबराव शेनपुडू पाटील, पदम हरसिंग पाटील, दगडू धुडकू पाटील, सुमनबाई बुधा पाटील, सुमित्रा भारत पाटील, आशाबाई साहेबराव पाटील, नीता महेंद्रसिंग पाटील, अर्चना सुधाकर पाटील, संगीता रवींद्र पाटील, रंजना विजय पाटील, इंदुबाई मधुकर पाटील, योजना पदम पाटील, आशा बाळू पाटील.
सर्वजण धरणगाव तालुक्यातील कल्याणी खुर्द येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील कल्याणी खुर्द आणि परिसरातील ४० भाविक खाजगी पर्यटन बसने अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असताना ही दुर्घटना घडली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून बसचे दरवाजे आणि खिडक्या तोडून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. जखमींना तातडीने कुरेभार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.