logo

पुणे शहरात जमाव, मिरवणूक व निदर्शनांवर निर्बंध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३९ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

प्रतिनिधी : सचिन गाडे
पुणे, दि. ६ डिसेंबर :
पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३९ (१)(२)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) यांनी जारी केले आहेत.

शहरात विविध संघटना, राजकीय पक्ष व इतर घटकांकडून मोर्चे, निदर्शने, सभा तसेच जमाव आयोजित केले जाण्याची शक्यता असून, त्यातून सार्वजनिक शांतता भंग होण्याचा धोका असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशानुसार पुणे शहर हद्दीत पुढील बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत —

शस्त्रे, बंदुका, काठ्या, सोटे, दगड, ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास मनाई

जमाव जमवणे, मोर्चे, सभा, मिरवणुका काढण्यास बंदी

घोषणाबाजी, चिथावणीखोर भाषणे, समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई

पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्यास बंदी


हे आदेश दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी ००.०१ वा. पासून ते २२ डिसेंबर २०२५ रोजी २४. ०० वा. पर्यंत या कालावधीत लागू राहणार आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर या आदेशांचा परिणाम होणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

1
0 views