logo

दीड लाखांची लाच घेताना भूमिअभिलेख कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहात पकडले!

अहिल्यानगर प्रतिनिधी - भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक अजयभानसिंग गुलाबसिंग परदेशी (वय ४८, नियुक्ती नेवासा भूमीअभिलेख, उपअधीक्षक कार्यालय, रा. भानोदय बंगला, जनरल अरुण वैद्य कॉलनी, जामखेड रस्ता, अहिल्यानगर) यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १.५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.
या घटनेची पार्श्वभूमी अशी, पाथरवाला गायगव्हाण (या. नेवासा ) शिवारात तक्रारदार, त्याचे भाऊ, वडील व इतर शेतकऱ्यांची शेती आहे. तेथे जाण्यासाठी शिवरस्त्यावर अतिक्रमण असल्याने तक्रारदाराचे भाऊ व इतर शेतकऱ्यांनी शिवरस्ता खुला करण्यासाठी नेवासा तहसीलदारांकडे ३१ जानेवारी २०२२ रोजी अर्ज केला होता. त्यावर तहसीलदारांनी मोजणी आदेश देऊन मोजणीचा खर्च अर्जदार शेतकऱ्यांनी भरावा असा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध तक्रारदाराचे भाऊ व इतर शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला. उच्च न्यायालयाने शिवरस्ता खुला करण्याकरता मोजणीसाठी येणारा खर्च अर्जदार शेतकऱ्यांकडून न घेता शासनाने करावा, असा आदेश दिला होता.
शिवरस्ता मोजणी करून फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वांकरता खुला करण्यात आला. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर झाले. त्यावेळी गट क्रमांक ३० तसेच पाथरवाल्यातील काही शेतकऱ्यांनी पुन्हा मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून मोजणी शुल्क भरले. ६ जून २०२५ रोजी मोजणी अधिकारी जयदीप गाडे यांनी मोजणी केली व शिवरस्त्याच्या मधोमध खुणा दाखवल्या. त्यामुळे शिवरस्ता पुन्हा बंद झाला.
३० जूनला पुन्हा भूमी अभिलेख कार्यालयात तक्रारदाराच्या भावाने मोजणीसाठी अर्ज केला. त्यावेळी भूकरमापक अजयभानसिंग परदेशी यांनी तक्रारदाराकडे पूर्ववत मोजणी करून देण्याकरता भूकरमापक जयदीप गाडे यांच्यासाठी आपल्या वैयक्तिक प्रभावाचा वापर करून स्वतःचा फायदा करून घेण्याच्या हेतूने ३ डिसेंबरला १.५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम पंचासमक्ष काल, गुरूवारी स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पकडले व नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्यासह अंमलदार प्रफुल्ल माळी, विलास निकम, विनोद पवार यांनी सापळा रचून अजयभानसिंग परदेशी याला लाच घेताना पकडले. अधिक तपास नगरच्या पथकाचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट करत आहेत. यासंदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

18
894 views