logo

ऑटो रिक्षा - मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करावी


अहिल्यानगर, दि. ३ :राज्यातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी ऑनलाईन सभासद नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे.

मंडळामार्फत चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य सुविधा, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी ५० हजार रुपये पर्यंत आर्थिक साहाय्य, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच कामगार कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण अशा विविध योजनांचा समावेश आहे.

या लाभांसाठी इच्छुक चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासद नोंदणीसाठी अर्ज https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. नोंदणी करताना वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना, अनुज्ञप्ती, रेशनकार्ड, आधार व पॅन क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती नमूद करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत.

सादर केलेला अर्ज संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवला जाईल. सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर अर्ज मंजूर केला जाईल; तर अर्जात त्रुटी असल्यास संबंधित परिवहन कार्यालयाशी संपर्क करावा.

अर्ज मंजूर झाल्यावर सभासद नोंदणी शुल्क भरण्याबाबतचा संदेश अर्जदाराच्या मोबाईलवर प्राप्त होईल. शुल्क भरण्यापूर्वी https://ananddighekalyankarimandal.org/home/checkstatus या लिंकवर नोंदणी स्थिती तपासावी.

सभासद नोंदणी शुल्क रू.५०० व वार्षिक सभासद शुल्क रू.३०० अशी एकूण रू.८०० रक्कम भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर “अभिनंदन! आपण सभासद झाले आहात” असा पुष्टी संदेश अर्जदाराला प्राप्त होईल. नोंदणीची पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी, असेही परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

#ऑटोरिक्षाचालक #टॅक्सीचालक #कल्याणकारीमंडळ #आनंददिघेयोजना #महाराष्ट्रशासन #सभासदनोंदनी #RTO #कल्याणयोजना #वाहनचालकलाभ

9
3296 views