logo

अचानक गायब झाले नवरा-बायको; अशा स्थितीत दिसले की उडाली खळबळ..

बुलढाणा: नांदुरा तालुक्याच्या वडनेर भोलजी गावाजवळ एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
तेलंगणा राज्यातील सीतापूरम येथून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील लग्नसोहळ्याला एक दांपत्य निघाले होते.काही दिवसांची सुट्टी घेऊन गावी निघालेल्या दांपत्य आपल्या पांढऱ्या रंगाच्या कारने (क्रमांक MH-13-BN-8583) घरातून तर निघाले. मात्र, अचानक गायब झाले. पद्मसिंह दामू पाटील (वय ३६) आणि त्यांची पत्नी नम्रता पद्मसिंह पाटील (वय ३२) या दाम्पत्याचा गुरुवारी सायंकाळपासून ठावठिकाणा लागत नव्हता. आता अखेर हे दांपत्य सापडले आहे.

नेमकं काय घडलं?

दोघांचे शेवटचे मोबाईल लोकेशन खामगाव-मलकापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वडनेर भोलजी जवळ दाखवत होते. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटल्याने नातेवाईकांनी नांदुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. शुक्रवारी सकाळी महामार्गालगतच्या एका खोल विहिरीत पांढरी कार दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहेर काढली. कारमध्ये पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील या दोघांचेही मृतदेह आढळून आले. दोघेही कारमध्येच होते. ही बाब कळताच परिसरात खळबळ माजली आहे.

कोण आहे हे दांपत्य?

पद्मसिंह पाटील हे तेलंगणातील सीतापूरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत नोकरीला होते. ते पत्नीसह लग्नाला हजेरी लावण्यासाठी जळगावकडे निघाले होते. परंतु वडनेर भोलजी जवळ त्यांची कार महामार्गावरून थेट विहिरीत कोसळली की त्यांना कोणी तरी ढकलले, याचा शोध नांदुरा पोलीस सखोलपणे घेत आहेत.

गेल्या 24 तासांपासून नांदुरा पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळाली आहे. या दाम्पत्याच्या आकस्मिक निधनाने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्या मृत्यूचे खरे कारण लवकरच समोर येईल अशी कुटुंबीयांना आशा आहे.

440
30594 views