
*आता जनताच लढणार! सावनेरच्या विकासाचा 'मयूर' झेप घेणार; अपक्ष उमेदवाराला मिळतोय प्रचंड प्रतिसाद*
"खूप झाले पक्ष, आता अपक्ष!" सुशिक्षित पदवीधर मयूर पाचभावे यांनी जिंकला मतदारांचा विश्वास
प्रतिनिधी:सूर्यकांत तळखंडे
सावनेर, दिनांक २८ नोव्हेंबर:
सावनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ४ (ब) मध्ये सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वसाधारण (पुरुष) गटातून सुशिक्षित आणि पदवीधर उमेदवार मयूर पाचभावे यांनी "खूप झाले पक्ष, आता अपक्ष" अशी ठाम भूमिका घेत निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री घेतली आहे. यंदाची निवडणूक ही केवळ उमेदवाराची नसून जनतेच्या हक्काची लढाई आहे, असा संदेश देत त्यांनी ‘कप-बशी’ या चिन्हासह विकासाचा एक विश्वासार्ह आणि सक्षम पर्याय मतदारांसमोर उभा केला आहे.
सत्तेची खुर्ची मिळवणे हे आपले उद्दिष्ट नसून, सावनेरचा आणि विशेषतः प्रभाग ४ (ब) चा चेहरामोहरा बदलणे हेच आपले अंतिम ध्येय असल्याचे पाचभावे यांनी आपल्या प्रचारदौऱ्यात स्पष्ट केले आहे. त्यांचा हा प्रामाणिकपणा आणि उच्चशिक्षित विचारसरणी मतदारांना चांगलीच भावली आहे. केवळ आश्वासनांची खैरात न करता पाचभावे यांनी प्रभागाच्या विकासाचा एक सुनियोजित आराखडाच जनतेसमोर मांडला आहे. प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था दूर करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे आणि स्वच्छतेत सातत्य राखणे यांसारख्या मूलभूत सोयींवर त्यांनी प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचसोबत युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी शोधणे, शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि महिलांना सुरक्षित वातावरण व सुविधा पुरवणे या विषयांवरही त्यांनी भर दिला आहे.
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पक्षीय राजकारणाला आणि त्याच त्या चेहऱ्यांना कंटाळलेल्या सावनेरकरांनी मयूर पाचभावे यांच्या रूपाने एका नव्या आणि ऊर्जावान नेतृत्वाचे स्वागत केले आहे. त्यांच्या साधेपणामुळे आणि थेट जनसंपर्कामुळे प्रभागात एक सकारात्मक लाट निर्माण झाली असून, प्रत्येक घरातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. मतदारांचा हा वाढता उत्साह पाहता, यंदा प्रभाग ४ (ब) मध्ये ‘कप-बशी’ हे चिन्ह विजयाची मोहर उमटवणार आणि मयूर पाचभावे प्रचंड बहुमताने विजयी होणार, असा ठाम विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.