logo

महानगरपालिका निवडणुका आणखी पुढे? मतदार यादीचा कार्यक्रम बदलला; अंतिम यादी २२ डिसेंबरला; राज्य निवडणूक आयोगाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम बदलण्यात आला असून राज्य निवडणूक आयोगाने नव्याने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. मतदार यादी पुनर्रचनेसाठी आवश्यक प्रक्रिया वाढल्याने महानगरपालिका निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या मूळ कार्यक्रमात मोठा बदल करत आयोगाने आज बुधवारी, २६ नोव्हेंबर नवीन सुधारित तारखा जाहीर केल्या.

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना मतदार यादीसंदर्भात मार्गदर्शक सूचना देताच प्रभागनिहाय प्राथमिक मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्त्या, चुकांची दाखल, नावांची चुकीची नोंद, तसेच अनेक मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे हरकती व दुरुस्ती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाला वेळ वाढवावा लागला.

यामुळे संपूर्ण प्रक्रिया किमान दोन आठवड्यांनी पुढे ढकलली गेली असून, याआधी ५ डिसेंबरला प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी आता १० डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांच्या स्थळांची यादी १५ डिसेंबरला, तर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सुधारित वेळापत्रकामुळे निवडणुका स्वाभाविकपणे जानेवारी किंवा त्यानंतर ढकलल्या जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे, अशी चर्चा राजकीय व निवडणूक वर्तुळात सुरू झाली आहे.

मतदार यादीवरील त्रुटींमुळे अनेक ठिकाणी आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मतदारांची नावे वगळली जाणे, एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नोंद असणे, प्रभाग बदलताना मतदारांचे पत्ते व्यवस्थित अद्ययावत न होणे अशा तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडला आहे. त्यामुळे प्राथमिक यादीविरुद्ध हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून १० डिसेंबर रोजी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

सुधारित कार्यक्रम (मनपा निवडणुका – मतदार यादी) :

प्रारूप मतदार यादिवर हरकती व सूचना ३ डिसेंबर २०२५
हरकतींची छाननी व अंतिम मतदार यादी १० डिसेंबर २०२५
मतदान केंद्रांची स्थळ यादी १५ डिसेंबर २०२५
मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२५

मतदार यादीतील सुधारित कार्यक्रमामुळे पुढील निवडणूक वेळापत्रकावर परिणाम होणार हे स्पष्ट झाले आहे. आता अंतिम मतदार यादी २२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार असल्याने मतदारसंख्येची अंतिम आकडेवारी, प्रभागनिहाय नियोजन व त्यानंतर उमेदवारी अर्ज प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता निवडणुका आणखी लांबणीवर जाण्याची चिन्हे अधिक अधोरेखित झाली आहेत.

6
51 views