
संविधान दिनानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटी - पूर्तता विशेष मोहीम
२६ व २७ नोव्हेंबर रोजी शिबिराचे आयोजन....
अहिल्यानगर, दि. २५ –संविधान दिनानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहिल्यानगर यांच्यावतीने त्रुटी पूर्तता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून २६ व १७ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांमध्ये अर्जदारांना थेट कार्यालयात येऊन प्रलंबित त्रुटींची पूर्तता करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
समितीकडील अनेक अर्जदारांची प्रकरणे अर्जदार स्तरीय त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबित आहेत. तसेच CCVID-II प्रणालीद्वारे ई-मेलवर त्रुटी पाठवूनही अनेक अर्जदारांनी आवश्यक पूर्तता केली नसल्याने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (नि. श्रे.) सौ. रेश्मा माळी, उपायुक्त तथा सदस्य सचिव राकेश पाटील, सदस्य तथा संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या शिबिराचा लाभ इयत्ता १२ वी विज्ञान शाखा (शैक्षणिक, सेवा व निवडणूक), तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांस प्रवेशित मागासवर्गीय अर्जदारांना विशेषतः घेता येणार आहे. अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत समिती कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून त्रुटी पुर्तता करावी.
समितीकडून दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी विशेष सुनावणीमध्ये ७२ प्रकरणांवरील त्रुटींवर निर्णय घेण्यात आला. यातील काही अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच दि.१ एप्रिल २०२५ पासून आजअखेर एकूण २४ हजार २२६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून १ हजार ९६५ प्रकरणांमध्ये त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. उर्वरित प्रकरणांवर निर्णय प्रक्रिया सुरु आहे.
“अर्जदारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करू नये व त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे आमिष स्वीकारू नये.”
असे प्रतिपादन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
********
#संविधान_दिन #जात_प्रमाणपत्र_पडताळणी #त्रुटी_पूर्तता_मोहीम #विशेष_शिबिर #अहिल्यानगर #जातीचे_दाखले #जात_वैधता #शैक्षणिक_प्रवेश #मागासवर्गीय #२६_नोव्हेंबर #२७_नोव्हेंबर #प्रलंबित_अर्ज #शासकीय_योजना