
संविधान दिन सप्ताहानिमित्त मानवी साखळी
जनता विद्यालय पिंपळगाव सराई, ता. बुलढाणा — दि. २५ नोव्हेंबर २०२५
जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे संविधान दिन सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी भव्य मानवी साखळी, व्याख्यान व संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. “संविधान साखळी” या आजच्या मुख्य कार्यक्रमास प्राचार्य प्रमोद ठोंबरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रा. सुमित जाधव यांनी “संविधान आणि शिक्षण” या विषयावर प्रभावी व्याख्यान केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की—
“आजच्या स्पर्धात्मक युगात आपण विज्ञान, गणित, तंत्रज्ञान शिकवतो; पण संविधान शिकवत नाही. जर विद्यार्थ्यांना धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक न्याय याची जाणीव करून दिली नाही, तर आपली शिक्षणव्यवस्था अपूर्ण राहील.”
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मानवी साखळीबरोबरच संविधान विषयक घोषवाक्ये असलेल्या पाट्या, संदेशपत्रे व जनजागृतीपर प्रदर्शनाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की असा उपक्रम लोकशाही मूल्यांची जाण, संविधानाप्रती निष्ठा आणि राष्ट्रीय बांधिलकी अधिक दृढ करतो.
मंचावर पर्यवेक्षक संजय पिवटे, ज्येष्ठ शिक्षक गजानन पाटोळे व देविदास दळवी यांची उपस्थिती होती. संविधान सप्ताहानिमित्त व्याख्यान, मानवी साखळी व संविधान रॅलीचे आयोजन दिलीप शिंगणे यांनी केले.
कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालन विद्यालयातील हिंदी विषयाचे शिक्षक दशरथ चिभडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.