
महाराष्ट्र राज्यात ५ हजार नवीन आरोग्य केंद्रांची उभारणी; सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांची माहिती
महाराष्ट्रात प्राथमिक आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णयाची तयारी केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात सुमारे ५ हजार नवीन आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे उभारण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम करण्यात आला असून, तो लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर होणार आहे.
या नवीन केंद्रांमध्ये प्राथमिक उपचार, मातृ- बाल आरोग्य सेवा, प्रयोगशाळा सुविधा, औषध पुरवठा, तसेच डिजिटल आरोग्य नोंदी (E-Health) अशी अत्यावश्यक साधने उपलब्ध असणार आहेत. ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यावर या योजनेचा विशेष भर असून, जिल्हानिहाय गरजेनुसार केंद्रांचे स्थान निश्चित करण्यात आले आहे.
सरकारच्या आरोग्य धोरणानुसार, ही केंद्रे टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार असून पहिल्या टप्प्यात हजारभर केंद्रांचे काम सुरु होण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळताच बांधकाम, उपकरण खरेदी आणि कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया वेगाने राबवली जाईल.
आरोग्य विभागाच्या मते, ही योजना राज्यातील प्राथमिक आरोग्य यंत्रणेला नवे बळ देणारी व गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी पायाभूत सुधारणा ठरणार आहे.