
संविधान दिन सप्ताहानिमित्त व्याख्यान व प्रश्नमंजुषा स्पर्धा
जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे संविधान दिन सप्ताहानिमित्त दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य प्रमोद ठोंबरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, “विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी दाखवलेली जिज्ञासा, तयारी आणि आत्मविश्वास उल्लेखनीय आहे. अशा स्पर्धांमुळे विचारशक्ती, लोकशाही मूल्यांची जाण आणि राष्ट्रीय बांधिलकी दृढ होते,” अशी प्रशंसनीय भावना व्यक्त केली.
या उपक्रमात प्रा. उमेश जगताप यांचे संविधान विषयक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी “जिथे अंधश्रद्धा आहे, तिथे संविधान पूर्णपणे लागू झालेलं नाही, आणि जिथे संविधान खऱ्या अर्थाने रुजलंय, तिथे अंधश्रद्धेला जागाच नाही. संविधान हा अंधश्रद्धेचा प्रतिकार आहे, मुक्तीचा मार्ग आहे! संतांनी केलेल्या चमत्काराचा शब्दशः अर्थ न घेता मतितार्थ घ्यावा,” असा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या चार गटांनी सहभाग नोंदविला. ग्रुप A मधून कु. रेणुका खंडागळे आणि आर्यन पाटोळे, ग्रुप B मधून अफरोज खान आणि अलताफ शेख, ग्रुप C मधून समर्थ खेंते आणि समर्थ देशमाने, तर ग्रुप D मधून प्रतिक सुरडकर व श्रीकांत लोखंडे यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत ग्रुप A विजेता, तर ग्रुप C उपविजेता ठरला.
याशिवाय या कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे मंचावर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे समन्वयक गजानन वाघमारे होते, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या परीक्षक म्हणून विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. वैशाली मांजाटे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी सायली खंडागळे आणि रिया देशमुख यांनी नेटक्या पद्धतीने केले.