logo

*चक्रपाणी नगरात दोन विषारी सापांची दहशत; सर्पमित्र शुभम यांना दोन्ही साप सुरक्षितरीत्या पकडण्यात यश**

नाग आणि घोणस एकाच दिवशी आढळल्याने खळबळ; सर्पमित्राच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

नागपूर:
हुडकेश्वर परिसरातील चक्रपाणी नगर येथे रविवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अत्यंत विषारी साप आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्र शुभम पराळे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दोन्ही विषारी सापांना सुरक्षितरीत्या पकडण्यात यश आले असून मोठा धोका टळला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना चक्रपाणी नगरातील श्रीकृष्ण मंदिराच्या मागे दुपारी पाच वाजताच्या सुमारास घडली. तेथे एक दोन फूट लांबीचा विषारी नाग आढळून आला होता. सर्पमित्र शुभम यांनी या नागाला शिताफीने पकडून बरणीत बंद केले. ही घटना ताजी असतानाच सायंकाळी सात वाजता दुसरी घटना घडली.
येथील रहिवासी गजानन घारट हे घराबाहेर फिरत असताना त्यांना एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी धाव घेतली असता, एक मोठा साप भिंतीजवळील अडचणीच्या जागेत लपताना दिसला. सापाचा आकार मोठा असल्याने उपस्थित नागरिक आणि ती महिला प्रचंड घाबरले होते. त्यांनी तात्काळ सर्पमित्र शुभम पराळे यांना संपर्क साधला. यावेळी शुभम हे सीसीटीव्हीचे काम करत होते, परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी अवघ्या सात मिनिटांत वृंदावन कॉलनी गाठली.
तपासणी केली असता तो अत्यंत विषारी आणि आक्रमक प्रजातीचा 'घोणस' (मराठीत परड) असल्याचे लक्षात आले. हा साप अंगावर उडी मारून दंश करू शकतो, त्यामुळे शुभम यांनी आधी नागरिकांना दूर केले. त्यानंतर अत्यंत सावधगिरीने त्या घोणस सापाला हाताने पकडून बरणीत बंदिस्त केले.
दोन्ही सापांचा पंचनामा करून त्यांना वनविभागाच्या सेमिनरी हिल्स येथील केंद्रात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे. साप दिसल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सापावर लक्ष ठेवावे आणि सर्पमित्रांना बोलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


प्रतिनिधी: सूर्यकांत तळखंडे
9881477824

56
1293 views