logo

जनता विद्यालयात “हिंद की चादर” गुरू तेग बहादूर जयंती उत्साहात साजरी


पिंपळगाव सराई (ता. बुलडाणा) येथे जनता विद्यालयात “हिंद की चादर” म्हणून जगभर ओळखले जाणारे गुरू तेग बहादूर यांची जयंती भक्तिभावाने व राष्ट्रीय उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने विद्यालय परिसर देशभक्तीपर गीतांनी आणि गुरु-वंदनेच्या वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरू तेग बहादूर यांचे जीवनकार्य, शांततेचा संदेश, सर्वधर्म समभाव आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य यावर माहितीपर भाषण प्रभावीपणे सादर केले. मोगल अत्याचारांविरुद्ध धर्मरक्षणासाठी दिलेले त्यांचे अद्वितीय बलिदान स्पष्ट करताना “हिंद की चादर” हे बिरुद त्यांना का प्राप्त झाले याचे जिवंत चित्र विद्यार्थ्यांनी उभे केले. मानवी हक्क व धार्मिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी त्यांच्या शौर्याची प्रेरणादायी माहिती उपस्थितांना भावली.

या निमित्ताने सोनम मुकुलवार हिच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून गुरूंच्या आत्मत्यागाची प्रतीकात्मक अनुभूती साकारण्यात आली. गुरुवाणी पठण, किर्तन व देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि संस्कारपूर्ण रंग प्रदान केला.

प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गुरू तेग बहादूर हे मानवतेचे रक्षक, सहनशीलतेचे प्रतीक व धर्मस्वातंत्र्याचे आधारस्तंभ असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शातून नवी ऊर्जा घेण्याचे आवाहन केले. तर शिक्षक सतीश शेटे यांनी भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेच्या रक्षणातील गुरूंच्या योगदानावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांवर चालण्याची प्रेरणा दिली. प्रमुख उपस्थितीमध्ये सैलानी येथील लखन भौंड व शाळेचे पर्यवेक्षक संजय पिवटे हे होते.

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमाची सांगता “हिंद की चादर” या प्रार्थना गीताने करण्यात आली.

58
2323 views