
ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा महावितरण व
सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना राष्ट्रीय पुरस्कार
नांदेड, दि. २१ : स्वस्त व शाश्वत वीजपुरवठ्यासाठी महावितरणने अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देत आतापर्यंत केलेल्या एकूण वीज खरेदीच्या दीर्घकालीन करारांमध्ये तब्बल ६५ टक्के अपारंपरिक ऊर्जेचा समावेश केला आहे. यासह विद्युत व ऊर्जा क्षेत्रात केलेल्या विविध कामगिरीची दखल घेऊन १२ व्या नॅशनल अवार्डस् फॉर एक्सलन्स २०२५ इन पॉवर अॅण्ड एनर्जीच्या कार्यक्रमात महावितरण कंपनीला ‘पॉवर डिस्ट्रीब्यूशन युटिलीटी ऑफ द इयर’ आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी इनोव्हेटर ऑफ द इयर’ या राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
मुंबई येथे गुरुवारी (दि. २०) आयोजित कार्यक्रमात हे दोन्ही पुरस्कार मानव संसाधन विकासाचे विशेषज्ञ डॉ. आर. एल. भाटिया यांच्याकडून महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत, कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत गोंधळेकर, डॉ. संतोष पाटणी, सचिन घरत, शंतनू एदलाबादकर यांनी स्वीकारले.
केंद्र शासनाकडून सन २०३० पर्यंत देशात एकूण वीज निर्मिती क्षमतेमध्ये ५० टक्के अपारंपरिक ऊर्जेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५०० गिगावॅट (GW) पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता वाढविण्याचे धोरण आहे. त्यास अनुसरून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठा वेग दिला आहे. महावितरणने प्राधान्य दरांवर सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत ७२ हजार ९१८ मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. यामध्ये ४७ हजार ३४७ मेगावॅट (६५ ट्क्के) अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे.
ऊर्जा परिवर्तनामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा क्षेत्रात महावितरणने मोठी आघाडी घेतली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत २७७३ मेगावॅट क्षमतेचे ५१२ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. त्यातून ६ लाख २५ हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. तर देशात सर्वाधिक ६० टक्के म्हणजे ६ लाख ४७ हजारांवर सौर कृषिपंप महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आले आहे. यासह गेल्या दीड वर्षांमध्ये राज्यातील २ लाख ५० हजारांवर घरगुती ग्राहकांकडे छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी १ हजारांवर मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले असून या ग्राहकांचे मासिक वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.
महावितरणकडून विजेच्या मागणीचा अंदाज व त्याचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे मागणीचा अचूक अंदाज व सर्वात कमी खर्चात वीज खरेदीचे व्यवस्थापन सुरू आहे. सूक्ष्म वीज खरेदीच्या नियोजनाद्वारे विजेचे कुठेही भारनियमन न करता विक्रमी २६ हजार ४९५ मेगावॅट विजेचा सुरळीत पुरवठा करण्यात महावितरणने यश मिळवले आहे, हे विशेष.
वीज वितरण यंत्रणेच्या प्रभावी संचालनासाठी माहिती तंत्रज्ञानावर मोठा भर देण्यात आला असून पायाभूत यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरण वेगात सुरू आहे. ग्राहकांना घरबसल्या सेवा देण्याची प्रक्रिया आणखी तत्पर करण्यात आली असून वीजभारात वाढ किंवा वीजबिलाच्या नावात बदल करण्यासाठी ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरीची प्रणाली सुरू आहे. यासह विविध उल्लेखनीय कामांची दखल घेऊन जागतिक मानव संसाधन विकास परिषदेच्या निवड समितीने महावितरण तसेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांची पुरस्कारासाठी निवड जाहीर केली.