logo

‘ते दिवस’ नाट्यप्रयोगाने जिवंत केले गतकाळाचे सावट

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आज सादर होणार 'संपूर्ण' हे नाटक

नांदेड, ता.१९ : ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत मंगळवारी (ता.१८) डॉ. शंकरराव चव्हाण नाट्यगृहातील ‘ते दिवस’ या नाट्यप्रयोगाने रसिकांना भावविश्वाच्या खोल गाभाऱ्यात नेऊन एक अस्वस्थ करणारा आणि विचारांना चैतन्य देणारा अनुभव दिला. क्रांती हुतात्मा स्मारक चारिटेबल ट्रस्ट, परभणी या संस्थेने सादर केलेल्या नाटकात लेखक विजय करभाजन आणि दिग्दर्शक सुनीता करभाजन यांनी १९६० - ७० च्या दशकातील सामाजिक वास्तव, मानवी मानसिकता आणि प्रतिष्ठेच्या हव्यासाचे सखोल चित्रण प्रभावीपणे उभे केले.

त्या काळात वंशपरंपरा टिकवण्यासाठी, पुत्रप्राप्तीच्या अपेक्षेत आणि समाजातील ‘मानमरातब’ जपण्यासाठी काही कुटुंबप्रमुखांनी घेतलेल्या कठोर, कधी कधी अमानवी निर्णयांचे परिणाम पुढील पिढ्यांच्या जीवनावर कसे खोलवर उमटत जातात, याचे संवेदनशील दर्शन ‘ते दिवस’ने घडवले. नाटक प्रेक्षकांना सांगते की प्रतिष्ठा आणि परंपरेच्या नावाखाली घडलेली चुकीची कृत्ये वेळेने झाकली गेली तरी, त्यांची सावली भविष्यातील पिढ्यांवर तशीच राहते. संध्याकाळी सात वाजता रंगमंचावर सुरुवात झालेला हा प्रयोग पहिल्याच प्रसंगापासून प्रेक्षकांना वेधून घेणारा ठरला. मुलाच्या भूमिकेत प्रेम शिंदे यांच्या अभिनयाने नाटकाला भावनिक केंद्रबिंदू प्राप्त झाला. शामलच्या भूमिकेत भाग्यश्री गायकवाड, दादा (रवि पुराणिक), ज्योती जोशी (रखमा), सुहास बिडकर (रुघु), लेखक विजय करभाजन (आबासाहेब), भानुदास जोशी (माधव मामा), कु. सई चिटणीस (उर्मिला), कु. श्रावणी कुलकर्णी (रेवती), चंद्रकांत मानोलिकर (डॉक्टर), नागेश कुलकर्णी (रमेश) आणि श्रीकांत कुलकर्णी (ड्रायव्हर) या सर्व कलाकारांनी स्वतःचे पात्र निष्ठेने जगल्याने एका कुटुंबाची संघर्षमय कहाणी रंगमंचावर तंतोतंत उभी राहिली. प्रत्येक भूमिकेने कथानकाला आपापली छटा दिली. नाटकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची तांत्रिक बाजू. किशोर पुराणिक आणि बालाजी दामुके यांनी उभे केलेले नेपथ्य अगदी काळाला साजेसे होते. रचना, वस्तूंच प्रभावी वापर आणि प्रसंग बदलतानाची नेपथ्यगत चपळता नाटकाला अधिक सलग बनवते. रेवती पांडे आणि रेणुका अंबेकर यांनी केलेली रंगभूषा व वेषभूषा त्या काळातील पोषाख शैली आणि जीवनमानाचे दर्शन घडवणारी ठरली. संगीत क्षेत्रात त्र्यंबक वडसकर आणि श्रध्दा वडसकर यांनी नाटकातील भावनिक प्रसंगांना अधिक जिवंत केले. प्रकाशयोजना नारायण त्यारे आणि शौनक पांडे यांनी प्रत्येक प्रसंगाचा मूड अचूक पकडत नाट्यप्रयोगाची दृश्यात्मक ताकद वाढवली. रंगमंच व्यवस्था अरविंद शहाणे, दिनकर जोशी, बाळू साखरेकर, राजलक्ष्मी देशपांडे, प्रभाकर जोशी आणि मंगल जोशी यांच्या टीमने काटेकोरपणे सांभाळली. एकूणच, ‘ते दिवस’ हा नाट्यप्रयोग हा केवळ एक कथा नसून, भूतकाळातील कठोर वास्तवाचे प्रतिबिंब आणि भविष्यातील पिढ्यांसाठी चेतावणीसारखा ठरला.
आज सायंकाळी ७ वा. राजीव गांधी युवा फोरम, परभणी द्वारा निर्मित नाही आणि विजय करभाजन लिखित 'संपूर्ण' हे नाटक सादर होणार आहे. ही राज्य नाट्य स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य संचालनालायाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

0
57 views