logo

जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपालिकांच्या निवडणुकीत ‘घराणेशाही’चा ठसा ठळक

जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपालिकांसह २ नगरपंचायती—अशा १८ ठिकाणी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत कार्यकर्त्यांना मागे सारत अनेक मंत्र्यांनी व आमदारांनी नगराध्यक्षपदासाठी आपल्या घरातील सदस्यांनाच उमेदवारी देत ‘घराणेशाही’चा प्रभाव स्पष्टपणे दाखवून दिला आहे.

कार्यकर्त्यांच्या जोशावर, मेहनतीवर मोठे झालेले हे नेते निवडणुकीत मात्र सत्तेची दोरं आपल्या घरातच राहतील, याची काटेकोर खबरदारी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना ठेंगा दाखवत अनेक ठिकाणी पत्नी, मुलं, मुली, सुना निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दिसत आहेत.
कोण कुठून रिंगणात?
जामनेर – राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नगराध्यक्षपदासाठी पत्नी आणि माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांना उमेदवारी दिली आहे.
भुसावळ – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत.
चाळीसगाव – भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी.
पाचोरा – शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पत्नी सुनीता पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी तसेच मुलाला नगरसेवक पदासाठी मैदानात उतरवले आहे.
मुक्ताईनगर – शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना पाटील नगराध्यक्षपदासाठी रिंगणात.
अंमळनेर – माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील नगरसेवक म्हणून निवडणूक लढवीत आहेत.
पारोळा – माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांची सून वर्षा रोहन पाटील तसेच माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या पत्नी अंजली पवार या नगरसेवक पदाच्या शर्यतीत.
*कार्यकर्त्यांमध्ये नाराजी*
या उमेदवारींच्या पद्धतीमुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. निष्ठावान कार्यकर्ते बाजूला आणि नातलगांच्या गळ्यात हार अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
कार्यकर्त्यांच्या कष्टांवर उभे राहूनही, सत्तेची सूत्रे मात्र कुटुंबपातळीवर ठेवण्याच्या राजकीय भूमिकेमुळे आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळे वातावरण पाहायला मिळणार आहे.

10
863 views