logo

५५ साठ्यांठिकाणी जप्त केलेल्या २५८५ ब्रास वाळूचा जागीच लिलाव तहसीलदारांसह सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासनाला दिला अहवाल

जळगाव : धानोरा नजीकच्या गिरणा नदीच्या काठावर अवैध उपसा केलेल्या वाळूचा तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतंत्रपणे पंचनामा केला. तहसीलदारांच्या अहवालानुसार ५५ ठिकाणी २५८५ ब्रास तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार २३२८ ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वाळूसाठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थिर पथक नियुक्त केले असून या वाळूचा जागीच लिलाव करण्याची प्रक्रिया करण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे.

याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी धानोरा पोलिस पाटील तर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळाधिकाऱ्यांसह तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. धानोऱ्याला कोतवाल नसल्याने कारवाई टळली.

मध्यवर्ती कार्यालय जप्त

वाहनांमुळे 'हाऊसफुल्ल' दरम्यान, मध्यवर्ती कार्यालय परिसरात जप्त केलेल्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. कारवाईनंतर जप्त केलेल्या वाहनांना या परिसरात आता जागाही शिल्लक नसल्याने प्रशासनाला पर्यायी जागा शोधावी लागणार आहे.

वाळू वाहतूक अडचणीची

एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे माफियांचा या वाळूसाठ्यावर डोळा असताना पोलिसांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच दोन हजारांवर ब्रास वाळूची उचल करणे आणि तो साठा जळगावी आणल्यानंतर पुरेशी जागा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे प्रशासनाने जागीच लिलाव करुन वाळू विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे.

लिलावाची प्रक्रिया सुरू

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाने लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. किमान पंधरा दिवस ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे वाळू साठा असलेल्या गिरणाकाठावर स्थिर व बैठे पथक कायम राहणार आहे.

13
695 views