logo

देशभक्ति 🙏

केवळ एक निरोप… आणि अवघ्या एका तासात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंत्यविधीसाठी व्ही. शांताराम यांनी लष्करी गाड्याप्रमाणे ट्रक सिद्ध करून पाठवला.

आज व्ही. शांताराम यांचा जन्मदिन. यानिमित्ताने त्यांच्या कलेइतकीच महान, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही ऐतिहासिक घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न…
२६ फेब्रुवारी १९६६… हा तो दिवस होता ज्या दिवशी एका महान स्वातंत्र्य सेनानीने आपले अखेरचे श्वास घेतले… स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्राणोत्क्रमण झाल्याची दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले. वार्ता समजताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांतसंघचालक कै. काशीनाथपंत लिमये आणि 'मराठा'चे संपादक आचार्य अत्रे आले. त्यांनी सावरकरांच्या खोलीत जाऊन अंत्यदर्शन घेतले.

आता अंत्ययात्रा काढण्यासाठी प्राथमिक सिद्धता करण्याचे दायित्व सर्वच कार्यकर्त्यांवर-विशेषतः हिंदूसभेच्या कार्यकर्त्यांवर पडले. सावरकरांचे अंत्यदर्शन घेताना त्यांचा क्रांतीकार्य ते समाजकार्य, अभिनव भारत, ब्रिटन, अंदमान, रत्नागिरी, हिंदुमहासभा असा सारा जीवनपट आचार्य अत्रेंच्या डोळ्यांसमोरून झरझर पुढे गेला. मातृभूमीकरता सर्वस्वासोबतच संपूर्ण कुटुंबाची आहुती देणाऱ्या एवढ्या महान तपस्व्याची अंतिम यात्रा ही त्यांच्या कार्याच्या भव्यतेला शोभेशीच असली पाहिजे, असा विचार करून त्यांनी सरकारी पातळीवर शासकीय इतमामात यात्रा निघावी यासाठी पुढाकार घेतला. त्यांचे पार्थिव नेण्यासाठी एक लष्करी गाडा मिळवण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिकाऱ्यांना तशी विनंती करण्यात आली. परंतु ती नाकारण्यात आली. सरकारी उदासीनता बघून अत्रेंच्या अंगाची लाहीलाही होत होती; मात्र त्यांनी निश्चय केलाच, काहीही झाले तरी स्वातंत्र्यवीरांची अंतिम यात्रा ही एखाद्या सेनापतीला साजेशीच होणार. त्याचक्षणी आचार्य अत्रे यांनी थेट एकच निर्णय घेतला… व्ही. शांताराम यांच्याकडे मदत मागायची.

आचार्य अत्रे यांनी व्ही. शांतारामांना संपूर्ण परिस्थिती सांगितली. शासनाकडून लष्करी वाहन न मिळाल्याने चित्रनगरीत उपलब्ध साधनांचा वापर करून तसाच एक ट्रक तयार करून द्यावा, अशी विनंती केली. आणि इथेच दिसते व्ही. शांताराम यांची राष्ट्रभक्ती, तत्परता आणि सावरकरांवरील अपार आदर.

आचार्य अत्रेंच्या या विनंतीला मान देऊन व्ही. शांताराम यांनी अवघ्या एका तासांत लष्करी गाड्याप्रमाणे सैनिकांचे चित्रफलक, तोफा-बंदुका असलेली मांडणी आणि लष्करी वाहनासारखा डौल, असा ट्रक सिद्ध करून सावरकरांच्या अंत्ययात्रेसाठी पाठवला. अंत्ययात्रा सावरकर सदनपासून ते गिरगावातल्या चंदनवाडी विद्युतवाहिनी पर्यंत असणार होती. सावरकरांचे पार्थिव हे व्ही. शांताराम यांनी तयार केलेल्या लष्करी गाड्यामध्ये ठेवण्यात आलं… आणि मग सैनिकी डौलात शांतारामांनी सजवलेला तो ऐतिहासिक रणगाडा स्वातंत्र्यविरांचे पार्थिव घेऊन निघाला चंदनवाडी विद्युतवाहिनीच्या दिशेने…

तब्बल ६-७ मैलांचे अंतर होते. यात्रेतील जनता ‘सावरकर अमर रहे', ‘सावरकरांच्या राजकारणाचा विजय असो', ‘हिंदू धर्म की जय', ‘हिंदू राष्ट्र की जय' आदी घोषणा देत होती. वाटेत ठिकठिकाणी कमानी, फुलांच्या परड्या रस्त्यांवर उभारल्या होत्या आणि सावरकरांचे शव ठेवलेला लष्करी गाडा जसा पुढे जात होता, तशी त्यावर परड्यांतून पुष्पवृष्टी केली जात होती. यात्रा जेव्हा आर्थर रोड तुरुंगापाशी आली, त्या वेळी एक आगळे दृश्य दिसले. तुरुंगाच्या बाहेरच्या मुख्य दारावर पहारा करणारे पोलीस शवगाडा समोर येताच, त्यांचा फिरता पहारा थांबवून, खांद्यावरच्या बंदुका खाली उलट्या धरून दक्ष स्थितीत नतमस्तक होऊन उभे राहिले होते; तर त्या चार भिंतींच्या मागे असलेल्या चाळीच्या वरच्या मजल्यावरून जमलेल्या कैद्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे', ‘स्वा. सावरकर की जय' अशा घोषणा देऊन श्रद्धांजली वाहिली….

हा केवळ अंत्यविधी नव्हता… तर तो होता एका महामानवाला संपूर्ण राष्ट्राने केलेला अभिवादन. जसे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचे स्थान सर्वोच्च स्थानी होते, तसेच भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णइतिहासात व्ही. शांताराम यांचे नावही सर्वोच्च स्थानावर आहे…. एका प्रखर देशभक्ताला श्रद्धांजली देण्यासाठी दुसऱ्या महान देशभक्ताने केलेला हा अद्वितीय योग आजही मराठी मनाला रोमांचित करतो…

#DevendraFadnavis #Savarkar #VShantaram

5
36 views