logo

देऊळवाडी ग्रामपंचायतीत वादांचा भडका; दोन वर्षांपासून न्यायासाठी भटकंती करणाऱ्या महिलेचे हाल

देऊळवाडी ग्रामपंचायतीत वादांचा भडका; दोन वर्षांपासून न्यायासाठी भटकंती करणाऱ्या महिलेचे हाल

देऊळवाडी, ता.— गावातील सुरेखा केंद्रे या महिलेने वडिलांच्या नावाचे घर आपल्या नावावर करण्यासाठी ग्रामसेवक प्रकाश पवार यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर उभ्या राहिलेल्या वादामुळे देऊळवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरणात ‘डुप्लिकेट अट’ तयार केल्याचा गंभीर आरोप ग्रामसेवक व सरपंच शुभम केंद्रे यांच्यावर होत असून दोन वर्षांपासून न्यायासाठी फिरणाऱ्या महिलेची व्यथा दिवसेंदिवस वाढत आहे.
कारवाईऐवजी ‘डुप्लिकेट अट’चा आरोप
सुरेखा केंद्रे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर कोणतीही प्रक्रिया न करता ग्रामसेवक प्रकाश पवार यांनी सरपंचांच्या सहकार्याने बनावट प्रकारची अट तयार केली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दिली; मात्र तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.
पोलिस ठाण्यातही निराशा
तक्रारीस न्याय मिळत नसल्याने संबंधित महिला वाढवण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या असता, जमादारांनी सरपंचांशी चर्चा करून “१५ दिवसांत कागद देतो” असे आश्वासन दिले. परंतु दोन महिने उलटूनही कोणतेही दस्तऐवज देण्यात आले नाहीत, असा आरोप महिलेने केला आहे.
सरपंचांकडून शिवीगाळ व आरोप?
पाठपुरावा करूनही काम न झाल्याने त्या सरपंचांच्या घरी गेल्या असता, “सोनं गेलं” असा आधारहीन आरोप आणि शिवीगाळ झाल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला. न्याय मागणाऱ्या महिलेवर उलट खोटे आरोप करून दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न
दरम्यान, गावातील नागरिकांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष कारभार, दस्तऐवज तयार करण्याची पद्धत, तक्रारींवरील कारवाई आणि अधिकारी व सरपंच यांच्यातील समन्वय याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत.
२ कोटींच्या रस्त्याच्या कामातील घोटाळ्याचाही उल्लेख
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की देऊळवाडी–गुंडपण–दापका या रस्त्याच्या तब्बल दोन कोटी रुपयांच्या कामात झालेला कथित घोटाळा, तसेच घरकुल योजनेतील अनियमितता कुणाच्या लक्षात येत नाही. मात्र न्याय मागणाऱ्या महिला मात्र खोट्या आरोपांना सामोरी जात असल्याने ग्रामवास्तवावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
गावात अस्वस्थता; न्याय मिळणार का?
दोन वर्षांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या महिलेचा आवाज आजही दाबण्याचे प्रयत्न सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे देऊळवाडीमध्ये प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असून या प्रकरणाची चौकशी होऊन सत्य बाहेर येईल का, हा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा आहे.

268
4236 views