logo

१६ नोव्हेंबर पासून रंगणार हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धा

नांदेडसह परभणीतील कलावंताचा राहणार सहभाग

नांदेड, दि. १४ ः महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे रविवार दि १६ नोव्हेंबर पासून ते २७ नोव्हेंबर दरम्यान रोज सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे आणि यात दररोज नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री.विभिशन चवरे यांनी नमूद केले आहे. नांदेड केंद्रावर एकूण ११ संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होणार आहेत.



रविवारी दि १६ नोव्हेंबर रोजी अष्टविनायक कला व क्रीडा आणि सेवा प्रतिष्ठान च्या वतीने 'उद्रेक' या नाटकाने स्पर्धेला सुरुवात होईल. सोमवार ता.१७ बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ, परभणीचे ‘भयरात्र’ (लेखक: रविशंकर झिंगरे, दिग्दर्शक: अनुपमा झिंगरे), मंगळवार ता. १८ क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्ट, परभणीचे ‘ते दिवस’ (लेखक: विजय कारभाजन, दिग्दर्शक: सुनीता कारभाजन), बुधवार ता.१९ मुक्ताई प्रतिष्ठान, देगलूरचे 'नटसम्राट' (लेखक: वि.वा शिरवाडकर, दिग्दर्शक: डॉ.मनीष देशपांडे), तर गुरुवार ता.२० राजीव गांधी युवा फोरम, परभणीचे 'संपूर्ण' (लेखक/ दिग्दर्शक: विजय करभाजन) सादर होईल. शुक्रवार ता.२१ सरस्वती प्रतिष्ठान तर्फे ‘ब्रम्हद्वंद’ (लेखक: सुहास देशपांडे, दिग्दर्शक : महेश घुंगरे), शनिवार ता.२२ रोजी शिवशंभो वीज प्रतिष्ठान तर्फे 'मीना' (लेखक/ दिग्दर्शक : प्रमोद देशमुख), सोमवार ता. २४ रोजी झपुर्झा सोशल फाउंडेशन, परभणीच्या वतीने ‘अस्वस्थ वल्ली’ ((लेखक/दिग्दर्शक : विनोद डावरे), त्यानंतर मंगळवारी ता. २५ स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडच्या वतीने 'स्वप्नपंख' (लेखक/दिग्दर्शक: दिनेश कवडे), बुधवार ता. २६ रोजी तन्मय ग्रुप, नांदेडचे 'अंधारयात्रा' (लेखक-दिग्दर्शक: नाथा चितळे), तर गुरुवार ता. २७ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आयोजित 'तो ती आणि मनोहर' (लेखक/ दिग्दर्शिक: अतुल साळवे यांचे नाटक सादर होणार आहे.



प्रवेश सर्वांसाठी नाममात्र शुल्क रु.१५ व रु.१० मध्ये असून, नांदेडमधील नागरिकांना महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आनंद घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. सर्व नाट्यप्रेमींनी या हौशी रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री.विभीषण चवरे यांनी केले आहे.

0
0 views