logo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत ‘सोलर शाळा’ उपक्रम..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत ‘सोलर शाळा’ उपक्रम



प्रतिनिधी गडचिरोली, 13

गडचिरोली, ता. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य व ‘रोझी ब्लू फाउंडेशन’च्या संचालिका श्लोका अंबानी यांच्या सामाजिक सहकार्यातून नक्षलग्रस्त व दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सौरऊर्जीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोझी ब्लू फाउंडेशन आणि त्यांच्या स्वयंसेवा प्लॅटफॉर्म ‘कनेक्ट फॉर’च्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक केले. ‘कनेक्ट फॉर’च्या संस्थापक श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक मानिती शाह यांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्याला अनुसरून देशातील अग्रगण्य अंबानी उद्योग समूहातील सदस्य श्लोका अंबानी यांनी नीती आयोगाने ‘आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘सोलर शाळा प्रकल्पा’अंतर्गत रोझी ब्लू फाऊंडेशनला काम करण्यास मंजुरी दिली. पहिल्या टप्प्यात फाउंडेशनने धानोरा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये सौरऊर्जेवर आधारित युनिट्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला. यात जिल्हा परीषद प्राथमिक शाळा धानोरा, मुसक्या, सालेभट्टी, रांगी, निमगाव, दुडमला, मुरूमगाव, बन्धोना, तसेच जिल्हा परीषद हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे शाळांमधील अध्यापन व डिजिटल शैक्षणिक उपक्रमांना वीजपुरवठ्यावरील अवलंबन कमी होऊन अखंड सुविधा मिळेल व या शाळांमधील सुमारे १, ४७० विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्लोका अंबानी यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू झालेला ‘सोलर शाळा प्रकल्प’ हा गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षणप्रणालीसाठी टिकाऊ, स्वच्छ आणि विश्वसनीय ऊर्जा पुरविणारा नवा आदर्श ठरत आहे

0
132 views