
देवेंद्र फडणवीस हे "अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री"
; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल ;
मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करताना अनेक गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात एक मोठा गौप्यस्फोट करत त्यांना "अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री" असे संबोधले. उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे "अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री" आहेत. खरं तर भाजपने सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याचा विचार केला होता, पण काही कारणांमुळे फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, ठाकरे यांचा हा गौप्यस्फोट महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणांवर नव्या चर्चांना वाचा फोडणारा ठरला आहे.
याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे, त्यांच्या दुःखाची जाणीव करून देण्यासाठीच माझा हा दौरा आहे.” मराठवाडा हा दुष्काळग्रस्त प्रदेश असताना यंदा अति पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, तर काहींचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं. “सत्तेत आल्यावर सातबारा कोरा करू असं सरकारने म्हटलं होतं, पण आजपर्यंत तसं झालं नाही. आता तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची वेळ आली आहे,” असं ते म्हणाले.
केंद्राकडून पाठवलेल्या पथकाबद्दल बोलताना त्यांनी टोला लगावला की, “केंद्रीय पथक आलं आणि गेलं कधी हे कुणालाच कळलं नाही.” त्यांनी या पार्श्वभूमीवर सरकारच्या निष्क्रीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ठाकरे म्हणाले की, “हे सरकार फक्त घोषणांच्या जोरावर चालतं आहे, पण जनतेच्या प्रश्नांवर उपाय नाही.”
दरम्यान, पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजप भ्रष्टाचार्यांना अभय देणारा पक्ष झाला आहे. मुरलीधर मोहोळ यांचा भ्रष्टाचार दाबण्यात आला, पण आमच्या नेत्यांवर मात्र चौकशा सुरू आहेत. भाजपकडून चालवलेला हा दुहेरी व्यवहार आता जनतेसमोर उघड होतो आहे,” असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या "अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री" या टिप्पणीमुळे विरोधकांना नवा मुद्दा मिळाला आहे, तर महायुतीच्या नेत्यांकडून या वक्तव्याला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यात ठाकरे यांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राजकीय रणनितीचा एक भाग असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.