
चातगाव टी-पॅाईंटवरील कारवाई
दारू व चारचाकी वाहनासह 9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त
दारू व चारचाकी वाहनासह 9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त
चातगाव टी-पॅाईंटवरील कारवाई
-November 3, 2025
गडचिरोली : दारुबंदी असताना अवैधरित्या छुप्या पद्धतीने दारुची वाहतूक आणि विक्री होत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोकुळनगरातील दारू तस्करांचे दारूच्या पेट्यांनी भरलेले वाहन पकडले. ही कारवाई चातगाव-कारवाफा टी पॅाईंटवर मध्यरात्री सापळा रचून करण्यात आली. मात्र वाहनातील दोन आरोपींनी अंधाराचा फायदा घेत जंगलाकडे पळ काढला.
प्राप्त माहितीनुसार, स्था.गु.शाखेच्या पथकाला गोकुळनगरातील आरोपी जिनेश मेश्राम आणि आकाश भरडकर हे चारचाकी वाहनाने चातगावमार्गे देशी व विदेशी दारुचा पुरवठा करणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी चातगाव-कारवाफा टी-पार्इंटवर सापळा रचला. एक काळ्या तपकिरी रंगाचे महिंद्रा कंपनीचे चारचाकी वाहन (एम.एच. 46, ए.एल.0027) टी पार्इंटच्या दिशेने येताना दिसून आले, यावरून रस्त्यात बॅरीकेड्स लावून पोलिसांनी वाहनास थांबण्याचा ईशारा केला. त्यामुळे चालकाने वाहन साखेरा ते जांभळी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर वळवले आणि अंधार व जंगलाचा फायदा घेत दोघे जण पळून गेले. यावेळी आरोपी जिनेश मेश्राम हा घटनास्थळावरुन पळून जाताना दिसून आला.
दोन पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे 45 सिलबंद खाकी खरड्याचे प्रतिबॉक्स 100 नग, अशा एकूण 4500 बाटल्या (किंमत 80 रुपयेप्रमाणे), अंदाजे किंमत 3,60,000 रुपये, 500 मि.ली. मापाचे हायवर्ड 5000 कंपनीच्या 120 नग बिअर (विक्री किंमत 350 रु.प्रमाणे अंदाजे 42,000 रुपये), 500 मि.ली. मापाचे बडवायजर मॅग्नम सुपर प्रिमीयम बिअर (96 नग, विक्री किंमत 350 रुपये प्रमाणे 33,600 रुपये), 180 मिली मापाचे रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की (96 निप, विक्री किंमत 400 रुपये प्रमाणे अंदाजे 38,400 रुपये), दारु वाहतुकीकरीता वापरण्यात आलेले चारचाकी वाहन (अंदाजे किंमत 5,00,000 रुपये), दोन मोबाईल असा एकूण 9 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पो.उपनिरीक्षक अश्विनी पाटील (पोस्टे चातगाव) करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पो.नि.अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि भगतसिंग दुलत, हवालदार सुधाकर दंडीकवार, नायक धनंजय चौधरी, चालक दीपक लोणारे यांनी पार पाडली.