भाजपा प्रदेश कार्यालयासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयाच्या जागेबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम प्रत्युत्तर दिले आहे. “भाजप कधीही काचेच्या घरात रहात नाही. प्रदेश कार्यालयासाठी घेतलेली जागा स्वखर्चाने घेतलेली असून, आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत आणि महापालिकेचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नवीन कार्यालयासाठी जागा हस्तांतरण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. राऊत यांनी म्हटले की, “भाजपच्या कार्यालयासाठी फायलीचा प्रवास राफेलच्या वेगाने झाला आणि अनेक बेकायदेशीर व्यवहार झाले.”त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनीही आरोप केला की, “महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे कार्यालय असलेली ही इमारत धोकादायक ठरवून रिकामी करण्यात आली आणि तीच जागा भाजपला ताब्यात देण्यात आली.”या सर्व आरोपांवर भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्यात बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्यांना जागा बळकावण्याची सवय आहे, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत. काही नतद्रष्ट लोक प्रश्न उपस्थित करतील, याची मला या जागेच्या खरेदीवेळीच जाणीव होती.”या विधानाने फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना थेट उत्तर देत भाजपची भूमिका ठामपणे मांडली आहे.