महाराष्ट्रातील कोयना जलाशयातील मुनावळे जलपर्यटन केंद्र सर्वात सुंदर स्थळ : राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा गौरवोद्गार
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरातील मुनावळे जलपर्यटन केंद्र हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाण असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले. राज्यपाल हे दोन दिवसीय सातारा दौऱ्यावर असून त्यांनी मुनावळे येथे सहकुटुंब भेट देऊन कोयना जलाशयातील निळ्याशार पाण्यात नौकाविहाराचा आनंद लुटला.राज्यपालांचा मुनावळे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल सध्या महाबळेश्वर येथे दिवाळीच्या सुट्टीसाठी मुक्कामी असून, त्यांनी या निमित्ताने कोयना परिसरातील पर्यटन स्थळांना भेट दिली.पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, “मुनावळे येथील कोयना जलपर्यटन केंद्राला भेट देण्याचे सौभाग्य मला लाभले. येथे असलेले स्वच्छ, निर्मळ पाणी आणि निसर्गरम्य परिसर पाहून मन प्रसन्न झाले. हे भारतातील सर्वात सुंदर स्थळ आहे. महाराष्ट्र शासन पर्यटनवृद्धीसाठी करत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून, या प्रयत्नांमुळे येत्या काळात हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरेल.”राज्यपालांनी सुमारे अर्धा तास बोटीमधून कोयना जलाशयात जलपर्यटनाचा आनंद घेतला आणि वासोटा किल्ल्याच्या परिसरातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. मुनावळे जलपर्यटन केंद्रातील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत पर्यटन विकासासाठी शुभेच्छा दिल्या.