logo

"बोगस प्रकार रोखण्यासाठी मतदार याद्या तपासा; हा पैशाचा माज आहे, जनतेचा कौल नाही" — उद्धव ठाकरे

मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निर्धार मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला की, येत्या निवडणुकांपूर्वी आपल्या विभागातील मतदार याद्या तपासणे अत्यावश्यक आहे. त्यांनी म्हटले की, “लोकसभेला आपण यश मिळवले आणि विधानसभेत केवळ वीस जागा मिळाल्या, हे महाराष्ट्राचे खरे चित्र नाही. हा महाराष्ट्र एवढा कृतघ्न असू शकत नाही. माझा या जनतेवर विश्वास आहे आणि मला ठाम वाटते की हा निकाल जनतेचा कौल नसून पैशाचा माज आहे.”

उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांतील बोगस मतदार आणि मतचोरीच्या प्रकारांवर थेट प्रहार करत, विभागप्रमुख ते गटप्रमुख या सर्वांनी आपापल्या विभागातील मतदार याद्या तपासाव्यात, असे आदेश दिले. त्यांनी इशारा दिला की, “लोकशाहीत मतदार सरकार निवडतात, पण सध्याच्या परिस्थितीत सरकारच ठरवत आहे की कोण मतदान करणार आणि कोण नाही. हा लोकशाहीचा अपमान असून, हा बोगस प्रकार त्वरित रोखणे आवश्यक आहे.”

या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सध्याच्या सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनीही मतदार याद्यांमधील घोळांबाबत सादरीकरण करून, अनेक मतदारांची नावे गायब झाल्याचे, तसेच काही ठिकाणी एकाच नावाची पुनरावृत्ती असल्याचे दाखवले.

या निर्धार मेळाव्याद्वारे ठाकरे गटाने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, बोगस मतदानाविरोधात हल्लाबोल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

16
348 views