logo

मुंबई-गोवा महामार्गाचे दुृष्टचक्र कायम! पावसाळ्यानंतरही खड्डे, तडे आणि कोट्यवधींची मलमपट्टी वाया

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षे सुरू असूनही या मार्गाची दुरवस्था अद्याप कायम आहे. या वर्षीच्या पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा महामार्गावर खड्डे, तडे आणि उखडलेली डांबरी पृष्ठभाग दिसत आहे. महामार्गाच्या दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही रस्त्याचा दर्जा सुधारण्याऐवजी अधिकच खराब होत चालला आहे.

रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर ते कळंबे या भागांमधील महामार्गावर ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी तर पावसामुळे रस्त्याचा थर पूर्णपणे उखडला असून वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना किरकोळ ते गंभीर दुखापती झाल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) या मार्गाची वेळोवेळी मलमपट्टी केली जाते, मात्र काही दिवसांतच ती उखडून पडते. रस्त्यावर टाकलेले डांबर पावसात वाहून जाते आणि पुन्हा तेच खड्डे उघडे पडतात. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मलमपट्टीच्या नावाखाली सरकारी निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. “दरवर्षी त्याच जागेवर काम, तेच खड्डे, आणि पुन्हा तीच मलमपट्टी,” अशी जनतेची उपरोधिक टीका आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांचा जीवनवाहिनी मानला जातो. मात्र एवढ्या महत्त्वाच्या मार्गाची अशी दुर्दशा पाहून नागरिक संतप्त झाले आहेत. “या महामार्गाचे काम पूर्णत्वाला न गेल्याने प्रवासाची वेळ वाढली, खर्च वाढला आणि धोकेही वाढले,” असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सतत खड्ड्यांमधून होणारे हादरे सहन करावे लागतात. या सततच्या प्रवासामुळे अनेकांना कंबरदुखी, पाठीचा त्रास आणि स्पॉन्डिलायटिस सारखे आजार उद्भवत आहेत. काहींना तर प्रवासानंतर औषधोपचार घ्यावे लागत आहेत. “रस्त्याची ही अवस्था पाहता, तो आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागला आहे,” असे स्थानिकांनी सांगितले.

रत्नागिरीतील नागरिक अनिल जाधव म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था इतकी भयंकर झाली आहे की आम्ही आता सहनशीलतेची मर्यादा गाठली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण दर्जेदार रस्ता तयार होत नाही. जर या वेळी ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याची आणि विद्यमान मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. हा महामार्ग फक्त पर्यटन किंवा व्यापारासाठी नव्हे, तर कोकणातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने त्याचा दर्जा राखणे हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असल्याचे नागरिक ठामपणे सांगत आहेत.

12
764 views