logo

दिवाळीत हरवला ‘आनंदाचा शिधा’; शासन निर्णयाचा पत्ता नसल्याने गोरगरिबांचा अपेक्षाभंग

महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, गोरगरिबांसाठी आनंदाचा शिधा मात्र शासनाच्या निर्णयाअभावी हरवला आहे. २०२२ साली सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सणासुदीच्या काळात रेशन दुकानातून फक्त १०० रुपयांत साखर, चणाडाळ, रवा आणि पामतेल या वस्तूंचा संच उपलब्ध करून देण्यात येत होता. मात्र यंदा दिवाळी जवळ येऊनही अशा कोणत्याही योजनेचा निर्णय न झाल्याने लाभार्थ्यांची निराशा झाली आहे.

२०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने ही योजना सुरू केली होती, ज्यामुळे गरिबांचा सण गोड झाला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी या शिध्याचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. मात्र निवडणुका संपल्यानंतर सरकारकडून कोणताही नवा निर्णय जाहीर करण्यात आला नाही. परिणामी ‘आनंदाचा शिधा’ या नावाने गाजलेली योजना यंदा दिवाळीत गायब झाली आहे.

गेल्या वर्षभरात गौरी-गणपती, नवरात्र, दसरा हे सर्व सण पार पडले तरी सरकारकडून शिध्याची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. दिवाळी सुरू झाल्यानंतरही आनंदाचा शिधा न मिळाल्याने अनेक लाभार्थी कुटुंबांची आशा मावळली आहे. “दिवाळीत तरी शासन काहीतरी जाहीर करेल” अशी भाबडी अपेक्षा असलेल्या जनतेचा आता पूर्णपणे अपेक्षाभंग झाला आहे.

गोरगरीब जनतेसाठी आनंदाचा शिधा हा केवळ वस्तूंचा संच नसून सणाचा आनंद वाढवणारा आधार होता. मात्र शासनाच्या मौनामुळे यंदा अनेक कुटुंबांना सणात गोडीपेक्षा खंतच अधिक जाणवत आहे.

शासनाच्या निर्णयाअभावी “आनंदाचा शिधा” यंदाच्या दिवाळीत हरवला आहे. त्यामुळे गरीब जनतेचा सण फिका झाला असून सरकारने पुढील सणांपूर्वी यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

19
947 views