logo

कोकणात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला; हवामान खात्याचा यलो अलर्ट कायम

कोकणात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार सरींनी हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी कोकण किनारपट्टीला झोडपून काढले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले भातपीक सततच्या पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून भात व भाजीपाला पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे.

वादळी पावसाचा परिणाम मत्स्य व्यवसायावरही झाला आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असून वाऱ्याचा वेग वाढल्याने मच्छीमारांनी आपल्या नौका बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. ऐन हंगामात मासेमारी ठप्प झाल्याने मच्छीमारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने २९ ऑक्टोबरपर्यंत कोकण किनारपट्टीसाठी “यलो अलर्ट” जारी केला असून, पुढील काही दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. काही भागात झाडे कोसळणे, रस्ते खचणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क केले असून नागरिकांना सावध राहण्याचे, विजांच्या गडगडाटाच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाने नागरिकांना ‘दामिनी' अॅप डाउनलोड करून विजांच्या हालचालींची माहिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने कोकणवासीयांनी खबरदारी घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

9
411 views