विव्हेवाडीचे ग्रामसभेत 81 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवावर खुनी हल्ला सुरक्षेची मागणी
ग्रामसभेत ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर हल्ला; सुरक्षा करण्याची मागणीविव्हेवाडी (पुरंदर), जि. पुणे :ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शुक्रवारी (दि. 3 ऑक्टोबर 2025) सकाळी ग्रामसभेदरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नळाला पाणी न येण्याबाबत साधी विचारणा केली असता ग्रामपंचायतीचा शिपाई ज्ञानोबा लक्ष्मण भगत याने संबंधित नागरिकाचा गळा आवळल्याचा आरोप करण्यात आला आहे.घटनेत पीडित नागरिकाचा श्वास रोखला जाऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दोन तास बोलता येत नसल्याचे पीडितांनी सांगितले. या प्रसंगी सुरेश कारकुंडे, प्रभाकर चिव्हे व अन्य काही व्यक्तींनी धमक्या देत खून करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.पीडितांच्या म्हणण्यानुसार वर्ष 2020 पासून गावातील काही पुढारी प्रवृत्तीच्या व्यक्ती सतत बेकायदेशीर बैठक घेत असून गावात भांडण, गटबाजी आणि दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. ग्रामस्थ वसंत डोंगरे, भाऊ बारणे, बाजीराव बार्शीलकर, बाळू गवारे इत्यादींच्या समोर हा प्रकार घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.घटनेनंतर पीडिताने आपल्या जीवितास व कुटुंबाच्या सुरक्षेस गंभीर धोका असल्याचे सांगत संबंधित आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तसेच भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास यास सर्व आरोपी जबाबदार असतील, असेही पीडिताने निवेदनात म्हटले आहे.गावात सलग सुरू असलेल्या गटबाजीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.