logo

वादानंतर अविवाहित महिलेचा प्रियकरानेच केला खून

आरोपी फरार : बारा दिवसात दुसरी घटना ; नागरिकांमध्ये भिती

नांदेड, दि. २६

किनवट तालुक्यातील पाटोदा (खुर्द) गावात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादानंतर अविवाहित महिलेचा तिच्याच प्रियकराने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी समोर आली असून, आरोपी सध्या फरार आहे. अवघ्या बारा दिवसांत किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा दुसरा खून असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा (खुर्द) येथील मंगल धुमाळे (वय ४५) ही अविवाहित महिला गावातच आई आणि भावापासून वेगळी राहत होती. तिचे गावातीलच कृष्णा जाधव (वय ३०) या युवकासोबत प्रेमसंबंध होते. कृष्णा हा नियमितपणे मंगलच्या घरी येत असे. मात्र तो दारूच्या आहारी गेल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. २४ ऑक्टोबरच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मंगलची आई पाणी आणण्यासाठी तिच्या घरी गेली असता, ती घरात निपचित अवस्थेत आढळली. तिच्या तोंडावर उशी ठेवलेली होती आणि जीभ बाहेर आलेली होती. यावरून गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.



दरम्यान, मृतक मंगलच्या बहिणीने रात्री कृष्णाला घरातून बाहेर जाताना पाहिल्याचे सांगितले आहे. तसेच दरवाज्यासमोर त्याच्या चपला आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. घटनेनंतर आरोपी कृष्णा गावातून फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी विशेष पथके तयार करून गस्त वाढविण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवीदास चोपडे, पोहेकॉ. सिद्धार्थ वाघमारे, ओमकार पुरी, प्रदीप आत्राम, सदाशिव अनंतवार, महिला पोलिस गोरे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. दरम्यान या घटनेमुळे पाटोदा (खुर्द) परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

0
99 views