logo

धरणगाव तालुक्यात भीषण अपघात — रील बनवण्याच्या मोहाने दोन तरुणांचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील पाळधी-चांदसर रेल्वे गेटजवळ रविवारी (25 ऑक्टोबर) सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोबाईलवर रील बनवण्याच्या मोहाने दोन तरुणांचे आयुष्य अक्षरशः संपवले.

रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता धावत्या अहमदाबाद–हावडा एक्सप्रेससमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना ट्रेनच्या धडकेत दोन शाळकरी मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रशांत पवन खैरनार (वय 18) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय 18, दोघेही महात्मा फुले नगर, पाळधी येथील रहिवासी) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टीचा दिवस असल्याने दोन्ही मित्र रेल्वे ट्रॅकवर जाऊन मोबाइलद्वारे धोकादायक रील व्हिडिओ शूट करत होते. त्यावेळी धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अहमदाबाद–हावडा एक्सप्रेसने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण घटनेत दोघांनाही बचावाची संधी मिळाली नाही.

या निष्काळजी आणि साहसी कृत्यामुळे दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

0
88 views