
अमळनेर: ज्ञानदीप ग्रंथालय व मोफत वाचनालयला २७ वर्षे पूर्ण — रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन २६ ऑक्टोबर रोजी
अमळनेर: ज्ञानदीप ग्रंथालय व मोफत वाचनालयला २७ वर्षे पूर्ण — रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन २६ ऑक्टोबर रोजी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – ज्ञानदीप ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर या प्रतिष्ठित संस्थेला यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २७ वर्षे पूर्ण झाली. अमळनेर शहरातील हे शासनमान्य इतर-ब वर्ग ग्रंथालय उत्कृष्ठ वाचनालय म्हणून नावलौकिक आहे. संस्थेच्या ध्येयानुसार, ज्ञानदीप ग्रंथालय ‘सार्वजनीक ग्रंथालय’ असून सर्व वयाच्या वाचकांसाठी ज्ञानवृद्धीसाठी वाचनाची सोय उपलब्ध करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ग्रंथालय आपल्या सांस्कृतिक वारशाला जोपासून, तो विचारांद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्याचे कार्य करते. या माध्यमातून समाजात सुसंस्कृत मूल्यांची जोपासना होत असून, सुसंस्कृत समाज निर्मितीस मोठी मदत होते.
याच निमित्ताने ज्ञानदीप ग्रंथालयाचा रौप्य महोत्सवी विशेषांक प्रकाशन सोहळा २६ ऑक्टोबर २०२५, रविवार, दुपारी ४.३० वाजता आयोजित केला आहे. सोहळ्याचे अध्यक्ष श्री. भिमराव गोविंदराव महाजन (अध्यक्ष, ज्ञानदीप ग्रंथालय) राहणार आहेत, तर विशेषांकाचे प्रकाशन श्री. सुहासजी रोकडे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव) आणि श्री. सुनिलजी जगताप (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नाशिक) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सत्राचे प्रमुख अतिथी डॉ. प्रा. शांताराम ओंकार महाजन (संस्थापक उपाध्यक्ष), अँड. सुदाम श्रावण महाजन (उपाध्यक्ष), श्री. सुहास गोपीचंद देवकर (सहचिटणीस), प्रा. नारायण वामन खोडके (संस्थापक सहचिटणीस), प्रा. देविदास सहादू लोहार आणि श्री. रविंद्र पुंडलिक महाजन (संस्थापक सदस्य) राहतील. तसेच संस्थेचे कार्यकारी सदस्य श्री. शांताराम दोधू महाजन, श्री. राजेंद्र भास्कर महाजन, श्री. नरेश देविदास महाजन, प्रा. रविंद्र गंगाराम माळी, सौ. सुवर्णा राजेंद्र महाजन आणि सौ. मनिषा किरण सूर्यवंशी उपस्थित राहतील.
ज्ञानदीप ग्रंथालय कार्यकारी मंडळ सदैव संस्थेच्या भरभराटीसाठी प्रयत्नशील राहते. उत्तम वाचनाचा व्यासंग, उदार व उन्नत दृष्टिकोन, तसेच वाचकांसाठी विविध साहित्याची उपलब्धता यामुळे ग्रंथालयाची कामगिरी ‘वटवृक्ष’ प्रमाणे फलदायी ठरली आहे. विनाअनुदानित असूनही शासनमान्य इतर-क वर्गातून इतर-ब वर्गात मार्गक्रमण केले आहे.
रौप्य महोत्सवी विशेषांक प्रकाशन सोहळ्यास संस्थापक कार्यकारी मंडळापासून आजीवन सदस्य, वर्गणीदार, बाल वाचक, नियमित वाचक, स्पर्धा परीक्षा अभ्यासक, ग्रंथ व वाचन प्रेमी तसेच ग्रंथालयावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन चिटणीस डॉ. राजेंद्र भिमराव महाजन आणि ग्रंथपाल श्री. नरेंद्र महाजन यांनी केले आहे.