
अतिवृष्टी, खराब हवामान आणि CCI चा विलंब — कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
जळगाव: जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी यंदा अतिवृष्टी, खराब हवामान आणि शासनाच्या विलंबामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, त्यातच भारतीय कापूस महामंडळाचे (CCI) खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस खुल्या बाजारात कमी दरात विकावा लागत आहे.
दरवर्षी दिवाळीपूर्वी खरेदी केंद्र सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत असे. मात्र यंदा सीसीआयने महाराष्ट्रात १५० केंद्र सुरू करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप केंद्र सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.
खाजगी व्यापारी या परिस्थितीचा फायदा घेत असून, कापसाचा बाजारभाव सुमारे ८१०० रुपये असताना ७ ते ७५०० रुपयांतच खरेदी करीत आहेत. त्यामुळे प्रती क्विंटल शेतकऱ्यांना सुमारे ₹१००० ते ₹१५०० चे नुकसान सोसावे लागत आहे.
यातच सोयाबीनच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ, ओला दुष्काळ आणि घटलेले उत्पादन या सगळ्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. शासनाकडून खरेदी केंद्र सुरू करण्यात होणारा विलंब हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा ठरत आहे.
राजकारणी मंडळी मात्र आपल्या राजकारणात गुंतलेली असताना, शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अक्षरशः अंधारात गेली आहे. शेतकरी संघटनांकडून शासनाने तातडीने सीसीआयची खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.