
राज्यात जल जीवन मिशन मध्ये घोटाळा_कोट्यवधी निधी पाण्यात
जल जीवन मिशन योजनेत कोण कोण झालं मालामाल..
कोट्यावधीचा निधी पाण्यात..
महाराष्ट्रात जल जीवन मिशन, महाजल योजना व आदी प्रकारच्या पाणीपुरवठा विषयीच्या विविध योजना राबविल्या गेल्या असल्या तरी शासनाचा ठिकठिकाणी कोट्यावधीचा निधी पाण्यात व अनेकांच्या गब्बर घशातच गेलेला आहे. नोटाबंदी तसेच भ्रष्टाचारविषयीचे कायदे करुनही सरकारी यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामांना लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी काही कमी झालेली नाही. अनेक गावागावात आजही गावपुढारी ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यांवर दबाव निर्माण करुन पाहतात. अवैध उत्खननातून लाखोंच्या लूट करून आपलीच घरे भरणारी रथीमहारथी कोटींचा महसूल चूना शासनालाच लावतांना दिसतात. गावागावात शाळा, महाविद्यालये आहेत पण पाणी नाही. आरोग्य केंद्र बंद अवस्थेत असले तरी पाण्याची व्यवस्था दिसत नाही. ग्रामीण भागातील पाणीटंचाई अद्यापही कायमच आहे. कालची बाई म्हणजे आताची मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण अद्यापही डोक्यावर हांडा घेऊन दुरवरुन पाणी आणतांना दिसतात. ग्रामीण भागात ग्रामपंचायत भ्रष्टाचारामुळे पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरलेली आहे. वित्त आयोगाचा निधी फक्त ऑनलाईन कामे दाखवून व कागदोपत्री बिले जोडून खर्च करण्यासाठी असतो असे चित्र दिसून येते आहे. ठिकठिकाणी माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड होतांना दिसत आहे. ग्रामपंचायतला येत असलेला निधी हा गाव पुढाऱ्यांना श्रीमंत करणारा की गावविकास करण्यासाठी असतो? असा प्रश्न पडतो आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवर अतिक्रमण करून परस्पर भूखंड विक्रीचे प्रकार होत आहेत. गावखेड्यातील डोंगर फोडून अवैधरित्या उत्खनन होतांना दिसते आहे. आजही अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांना लाच, दारू, मटण पार्टीचे आमिष देऊन राजरोस अवैधधंदे मोठ्या प्रमाणात होतांना दिसतात. रात्रीचा बेकायदेशीर होणारा वाळूउपसा कुणाच्या आशिर्वादाने चालतो हे सांगण्याची गरजच नाही. भ्रष्टाचार संपण्याऐवजी मोठ्या प्रमाणात, झपाट्याने वाढतांना दिसतो आहे. फक्त भ्रष्टाचाराचा मार्ग व दिशा बदललेल्या दिसत आहेत. भ्रष्टाचारामुळे महागाई गगनाला भिडली आहे. शहरातही ठिकठिकाणी व ग्रामीण भागातील गावागावात, दुषित पाणीपुरवठा होणार नाही याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राज्यात मोठे प्रकल्प राबविणे अत्यावश्यक आहे. तसेच जल जीवन मिशनमध्ये निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामांची पहाणी करून यात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या डोक्यावर हात ठेवून केवळ सत्तेसाठी, खुर्ची साठी, पदासाठी त्यांन आशिर्वाद न देता, पाठिशी न राहता कायदेशीर कारवाई करुन प्रामाणिकपणाचे धडे देणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी टक्केवारीत होणारा भ्रष्टाचारच वाढत्या महागाईला कारणीभूत ठरतो आहे हे मात्र नक्की. वाढती बेरोजगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, वाढती पाणीटंचाई अशा अनेक समस्यां कायमच आहे. यामुळे राज्यातील ठायीठायी होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम लावणे कितपत योग्य आहे हे जनतेनेच ठरवायला हवे बस एवढेच.
लेखन-सचिन नागरे ,किनगाव जटू ता लोणार जि बुलढाणा,
मो. 9604321432