logo

आव्हाणे येथे अज्ञातांनी जाळले किराणा दुकान

शेवगाव तालुक्यातील गणपती आव्हाणे येथे तीन अज्ञात युवकांनी रविवारी (दि. १९) मध्यरात्रीनंतर पावणेदोनच्या सुमारास येथील चौकात असणाऱ्या राहुल सीताराम कोळगे यांच्या किराणा दुकानात बंद शटरमधून पेट्रोल टाकून आग लावली. त्यात दिवाळीसाठी भरलेला सुमारे १० ते १५ लाखांचा किराणा माल जळून खाक झाला. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आव्हाने गणपती येथे ढोरजळगाव रस्त्याला राहुल सीताराम कोळगे यांचे साई गणेश या नावाने किराणा दुकान व गोदाम गेल्या ९ वर्षांपासून सुरू आहे. सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकान सुरू असते. दिवाळी दोन दिवसांवर आल्याने मोठ्या प्रमाणावर किराणा माल दुकानात भरून ठेवला होता. शनिवारी (दि. १८) दिवसभर दुकान चालवून रात्री ११ वाजेपर्यंत आवराआवर करून ते बंद करून कोळगे व त्यांचे सहकारी घरी गेले. रविवारी पहाटे राहुल यांचे भाऊ सचिन यांना शेजारी राहणारे मदन राऊत यांचा फोन आला, की तुमच्या दुकानाच्या शटरमधून धूर येत आहे. कोळगे यांनी ताबडतोब दुकान गाठले असता शटरच्या आतून धूर येत होता. माहिती कळताच गर्दी जमा झाली. कुलूप तोडून शटर उघडले असता आत किराणा माल जळून खाक झाला होता. काही किराणा सामान व फर्निचर जळत होते. त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या गोदामालाही आग लागून किराणा माल खाक झाला होता. तेलाचे डबे व इतर साहित्य वितळले होते. ग्रामस्थांनी शेजारी असलेले वीजपंप सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दुकानांमध्ये व समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने कोळगे यांनी फुटेज तपासले असता, रात्री पावणेदोनच्या दरम्यान तीन अज्ञात जॅकेटधारी युवक हातामध्ये मोजे घालून बाटलीने पेट्रोलसदृश द्रव शटरच्या आतमध्ये ओतताना व आग लावून पळून जाताना दिसून आले.
यामध्ये सुमारे १२ लाख रुपये किमतीचा किराणा व ५० हजार रुपये किमतीचे फर्निचर जळून खाक झाले. कोणाशीही वैर नसलेल्या या शेतकरी कुटुंबाचे दुकान पेटवून दिल्याने परिसरात
हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी दिवसभर कडकडीत बंद पाळला व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.

168
7963 views